Nagpur News : वेळेचं बंधन झुगारत नागपूरच्या रस्त्यांवर मध्यरात्रीच्या अंधारात महिलांनी खास चहा पार्टीचं आयोजन केलं होतं. नाईट लाईफ संदर्भात नागपूरच्या महिलांनी 'नाईट टी विथ आझादी' असा नवा उपक्रम राबवला. या चहाच्या खास पार्टीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. पण विशेष म्हणजे या महिलांसोबतच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील सहभागी झाल्या होत्या.
सर्व नियम फक्त महिलांनाच का?
नोकरी, व्यवसाय, उद्योगात यशस्वीरित्या काम करणारी महिला संध्याकाळी घरी परतली की तिने दुसऱ्या दिवशी सकाळीच घराबाहेर पडावं असा बहुतांशी कुटुंबातला अघोषित नियम असतो. मात्र, सातच्या आत घरात, अंधार पडल्यावर महिलांनी एकटे बाहेर जायचं नाही, रात्रीची वेळ महिलांसाठी सुरक्षित नाही. असे सर्व नियम फक्त महिलांनाच का? असा रास्त प्रश्न विचारत नागपुरातील काही महिलांनी 'नाईट टी विथ आझादी' असा आगळावेगळा उपक्रम राबवला. या अंतर्गत अनेक महिला मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरच्या शंकरनगर चौकामध्ये एकत्रित आल्या होत्या. या सर्व महिलांनी चहाचा आस्वाद घेत एकमेकींशी गप्पा केल्या.
थकवा घालवण्यासाठी मैत्रिणींशी भेटणं आवश्यक
महिला त्यांच्या व्यवसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यामुळं त्यांनाही शाररिक आणि मानसिक थकवा जाणवतो. तोच थकवा घालवण्यासाठी मैत्रिणींशी भेटणं आवश्यक असतं. जर पुरुष त्यांच्या नोकरी-व्यवसायानंतर एकमेकांशी रात्री कितीही वाजता भेटू शकतात. तर मग महिलांनी रात्रीच्या वेळेला घराबाहेर का पडू नये? असा प्रश्न या ठिकाणी जमलेल्या महिलांनी विचारला. महिलांच्या अनेक सुप्त इच्छा अव्यक्त राहतात, त्या व्यक्त व्हाव्या आणि पूर्ण व्हाव्या यासाठीचा हा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया काही महिलांनी दिली.
हा विद्रोह नाही तर नवी सुरुवात
आजही अनेक महिलांच्या मनात भीती आहेत. त्या सर्व महिलांनी भीती घालवली पाहिजे. आज आम्ही त्याची सुरुवात करतोय. मात्र, संपूर्ण महिला समाजाने हे करावे अशी आमची अपेक्षा असल्याचे येथील काही महिलांनी सांगितले. हा विद्रोह नाही तर नवी सुरुवात आहे. महिलांनी विशिष्ट वेळातच घरी यावं अशी डेडलाईनच नको अशी अपेक्षा देखील काही महिलांनी व्यक्त केली. दरम्यान, नागपूरच्या महिलांनी आयोजीत केलेल्या नाईट टी विथ आजादी या खास उपक्रमात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या:
Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील नागपूर-शिर्डी बस सेवा स्थगित, पुरेशी प्रवासी संख्या मिळत नसल्याने सेवा बंद करण्याची एसटी महामंडळावर नामुष्की