नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एक बॉम्ब (Bomb Found) सदृश्य वस्तू सापडून आली आहे. बॉम्ब सापडल्याची बातमी समजताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनेची माहिती तत्काळ गणेशपेठ पोलीस  (Nagpur Police) आणि बॉम्ब निकामी पथकाला देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेत त्या संशयास्पद वस्तूला सुराबर्डी येथे निकामी करण्यासाठी नेण्यात आले आहे. ज्या बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तु सापडली होती, ती बस गडचिरोलीतील अहेरी आगारातून नागपुरात पोहोचली असल्याची प्राथमिक माहिती सामोर आली आहे. पोलिसांनी बसस्थानकाची तपासणी करून या प्रकरणाच्या सखोल तपास सुरू केला आहे. 


गडचिरोली येथून आली होती बस   


गडचिरोली येथून एमएच 40 वाय 5097 या क्रमांकाची बस एक फेब्रुवारीला गणेश पेठ स्थानकात रात्री होलटींगसाठी आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडीचे काम निघाल्याने ही गाडी गणेश पेठ आगारात उभी होती. दरम्यान ही गाडी सावनेर येथे देखील गेली होती. नंतर ही गाडी आज सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास परत गणेशपेठ बस स्थानकावर आली. दरम्यान एका कर्मचाऱ्याला या बसमध्ये संशयास्पद एक टिफिनच्या आकाराची वस्तु आढळून आली. त्याचे निरीक्षण केले असता ही वस्तु अनोळखी आणि बॉम्ब सदृश्य भासल्याने त्या कर्मचाऱ्याने ही बाब आपल्या वारिष्ठाना सांगितली. त्यानंतर या बाबत माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत बस स्थानक निर्मनुष्य करत पुढील तपास सुरू केला. 


संशयास्पद वस्तु तपासणी साठी सुराबर्डीला रवाना


याप्रकरणी माहिती देताना गणेशपेठचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे म्हणाले, आज दुपारी एसटी आगारातून गडचिरोली आगाराच्या एका बसमध्ये टिफीन बॉक्स सापडल्याचा फोन आला होता. ही माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ गाठले. त्यानंतर हा संशयास्पद टिफीन सारखी वस्तु ताब्यात घेऊन तपासासाठी सुराबर्डी येथील केंद्रात पाठवण्यात आले आहे. तिथे चौकशीअंती खरी माहिती समोर येईल.


एका तारखेला ही बस अहेरीहून नागपूरला पोहोचली होती. त्यानंतर ती सावनेर ते नागपूर दरम्यान सतत धावत होती. कालही बस सावनेरला गेली होती. आज बस नेण्याची तयारी केली असता केबिन मध्ये टिफिन दिसला होता. बसमध्ये टिफिन किती वेळ होता आणि कुठून पोहोचला हा सर्वात मोठा प्रश्न उरतो. या संदर्भात बस चालकाची देखील चौकशी केल्या जाईल. मात्र सध्यातरी हा बॉम्ब सदृश्य वस्तु नेमकी काय या बाबत तपासणी अंतीच खरी माहिती समोर येणार असल्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nagpur Crime News: शहरात हत्यासत्र सुरूच! पाच दिवसांत चार खून; उपराजधानीत चाललंय तरी काय?