नागपूर : युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी(Police Custody) देण्यात आली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी कुणाल राऊतांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी  करत पोलिसांची मागणी फेटाळत जामीन मंजूर केला. 


25 हजार जातमुचलका आणि  10 हाजरांवर जामीन मंजूर


नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या पोस्टर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर कुणाल राऊत यांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत रहावं लागले होते. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी आपल्या जामीनासाठी अर्ज केला होता. तर नागपूर पोलिसांनी राऊतांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी नागपूर न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून कुणाल राऊतांना दिलासा दिला आहे. न्यायिक कोठडीमध्ये 25 000 रुपये जातमुचलका आणि  10 हाजर रुपये रोख घेत जमानतीसह न्यायालयाकडून हा जामीन मंजूर केला.


पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं


पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केला होता. शनिवार 3 फेब्रुवारीला आंदोलन करत नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक करत कायदेशीर कारवाई केली होती. 


नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून जोरदार आंदोलन


पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचं प्रकरण आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या सुनील केदार यांचा फोटो असल्याचा प्रकरण तापला होता. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे, म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर काँग्रेसचे सदस्यांनी सुनील केदार यांचा फोटो छापला होता. तेव्हा एका दोषसिद्ध आरोपीचा फोटो जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर का, भाजप सदस्यांच्या या प्रश्नावर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या