Nagpur DCM Devendra Fadnavis News : नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काटोल (Katol) इथल्या कार्यक्रमात गोंधळ झाला. काटोल नगरपरिषदच्या (Katol Municipal Council) विकास कामाचे भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा सर्वपक्षीय कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सुद्धा उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते राहुल देशमुख (Rahul Deshmukh) यांच्या भाषणाला भाजपने (BJP) आक्षेप घेतल्याने अनिल देशमुख आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले.


फडणवीस-देशमुखांच्या कार्यकर्त्यांचा राडा


राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणानंतर गोंधळ झाला. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून राहुल देशमुख यांचे भाषण थांबवावं लागलं. राहुल देशमुख यांचा रोष होता. या राड्यानंतर अनिल देशमुख हे भाषणाला उभे राहिले. मात्र, गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी भाषण अर्धवट सोडलं. देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं या कार्यक्रमात पाहायला मिळालं.


आजी-माजी गृहमंत्री एकाच मंचावर


शासकीय निधी वाटपासाठी भाजप मेळावा घेत असल्याच्या आरोपानंतर अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज एका व्यासपीठावर आले. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी काटोल नगर परिषदेच्या शासकीय कार्यक्रमात अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर आमदार म्हणून उपस्थित राहिले.  


देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही सुनावलं


यावेळी अनिल देशमुख यांच्या रोषाचा सामना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहन करावा लागला. भाषणात उपस्थितांचे जिल्हाधिकारी साहेब म्हणून मी तुमचा उल्लेख करतो असं त्यांनी सांगितलं. हा भाजपचा कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम आहे. सर्वपक्षीय नेते उपस्थित असल्याचंही त्यांनी सांगितलं. पट्टे वाटप करताना मला कसं थांबवलं, हेही देशमुखांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं.  


कार्यक्रमाआधी अनिल देशमुखांचा आरोप 


भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात पारडसिंगा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या महिला मेळाव्यासाठी महिला बचत गटाच्या महिला, तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी प्रत्येक गावातून 100 महिला आणाव्या असं पत्रच काटोलच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पाठवलं आहे. तसेच या 100 महिलांच्या नेआण करण्यासाठी लागणारा आवश्यक खर्च व वाहन खर्च ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून देण्यात यावं असा आदेशही गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. भाजपने राजकीय मेळावा घ्यावा, मात्र तो शासनाच्या निधीतून घेऊ नये असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला आहे.