Nagpur Crime News : एकीकडे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. खुनासारख्या गंभीर घटनांची नवीन वर्ष गाजवले आहे. सराईत गुन्हेगारांसाठी परप्रांतातून शस्त्र येत असल्याची माहिती तपासात हाती लागल्याचे समोर आले आहे. हिंगणा येथे घडलेला गोळीबार -प्रकरणातही परप्रांतातून आलेल्या बंदुकीचा वापर केला असावा, असा अंदाज लावण्यात येत असल्याची विश्वसनीय सूत्राची माहिती आहे.


या दृष्टीने पोलिस (Nagpur Police) प्रशासनाने तपासाची गती वाढवली आहे. हिंगणा शहरातील श्रीकृष्ण नगर येथे मित्राने आपल्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका मित्राचा बंदुकीने गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 11 आरोपींना अटक केली आहे.


11 जणांना अटक, तपास सुरुच


पत्नीला अपमानास्पद बोलण्याच्या संतापातून एका मित्राने दुसऱ्या मित्राला गोळीबार करून ठार केले. 9 जानेवारी रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान ही थरारक घटना घडली होती. या घटनेची माहिती होताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, पोलिस उपायुक्त अनुराग जैन यांनी भेट दिली होती. या घटनेतील आरोपी हत्या झाल्यानंतर पळून गेले होते. हिंगणा ठाणेदार विशाल काळे यांनी या आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार केले. या पथकाने घटनेच्या 24 तासाच्या आत सात आरोपींना अटक केली. यानंतर पुन्हा चार आरोपींना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे.


हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली, हा पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा विषय आहे. पोलिसांनी तपासाची गती वाढवली.हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तूल ही नेमकी आली कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास ठाणेदार विशाल काळे स्वतः करत आहेत.


शस्त्रांचा बाजार?


ग्रामीण भागात बंदूक विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची दाट शक्यता आहे. नागपूर शहरातील व ग्रामीण भागातील काही सराईत गुन्हेगारांकडे बंदुक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंगणा पोलिसांनाही बाहेर राज्यातून बंदूक विक्रीचा व्यवसाय कोण करतात, याचा तपास करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. यामुळे या प्रकरणातील पाळेमुळे खोलवर आहेत का, या दृष्टीनेही पोलिस आता तपास करीत आहेत.


शस्त्र तस्करीचे परप्रांत कनेक्शन!


बंदुकीची विक्री इतर राज्यातून नागपूर जिल्ह्यात होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. हत्या प्रकरणातील एक आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. यामुळे या आरोपीची परप्रांतीय लोकांशी संबंध आहे का, याची चौकशी पोलिस विभाग करीत आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांना बंदूक विक्री करणारी टोळी असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. ही टोळी नेमकी कुठे आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.


ही बातमी देखील वाचा...


शिंदे गटालाही फुटीची लागण! 'या' जिल्हा प्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा