Yavatmal Political News : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पक्षबांधणीसाठी एकीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी राज्यासह विदर्भातही रणनिती आखून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात करण्यात आली. मात्र विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्याची माहिती आहे. बेजंकीवार यांनी जिल्हाध्यक्षपदासह पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिला आहे.


बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार आपल्या राजीनाम्यावर ठाम राहतात की, पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजीनामा मागे घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


शिवसेनेत फुट पडल्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. राठोड यांच्या या बंडावेळीही गजानन बेजंकीवार हे त्यांच्या सोबत होते. मागील सुमारे 20 ते 25 वर्षांपासून बेजंकीवार सेनेत कार्यरत असून, राठोड यांचे विश्वासू म्हणून बेजंकीवार यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद सदस्य आणि त्यासोबतच पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महिनाभरापूर्वीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. या कार्यकारिणीतही गजानन बेजंकीवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपवीत पक्षाने आर्णी व वणी या तालुक्यांची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती.


जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताना सहकार्य, संवाद आणि विश्वास या कार्यसूत्रीने जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्याचा निश्चय करण्यात आला होता. तशी अपेक्षा मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली होती. मात्र, अवघ्या महिनाभरातच बेजंकीवार यांनी राजीनामा दिल्याने शिंदे गटालाही जिल्ह्यात फुटीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदावरून जिल्ह्यातील शिंदे गटात सध्या धुसफूस सुरू आहे. याच कारणावरून बेजंकीवार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह बाजार समितीच्या सभापतिपदाचाही राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पांढरकवडा बाजार समितीची फेब्रुवारी 2019 मध्ये निवडणूक झाली होती. 18 संचालक निवडून आले होते. रांझा मतदारसंघातून निवडून आलेल्या जानमहंमद अब्दुलभाई जिवाणी यांची सभापतिपदी वर्णी लागली, तर खेरगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रेमदास पांडू राठोड यांची उपसभापतिपदी वर्णी लागली.


अडीच वर्षानंतर बेजंकीवार यांची निवड


जिवाणी यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गजानन बेजंकीवार यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. उपसभापतिपदी प्रेमदास राठोड पूर्वीप्रमाणे कायम राहिले. आता बेजंकीवार यांच्या सभापतिपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. या पदावर आता कोणाला संधी द्यायची, याची चाचपणी शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून मतभेद निर्माण होऊन बेजंकीवार यांनी बाजार समितीच्या सभापतिदाबरोबरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. 


जिल्ह्यात वाढू शकतात शिंदे गटाच्या अडचणी


शिवसेनेतील बंडाळीनंतर संजय राठोड यांनी शिंदे गटाचा हात धरला. राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश तसेच पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी पुन्हा सेनेत प्रवेश करीत एकप्रकारे सेनेला बळकटी दिली असताना बेजंकीवार केल्यानंतर जिल्हा शिवसेनेत मोठी बंडाळी माजेल, असा कयास होता. मात्र, मोठ्या संख्येने शिवसैनिक यांच्या रुपाने शिंदे गटालाही फुटीची लागण झाल्याचे पुढे येत आहे. बेजंकीवार राजीनाम्यावर ठाम राहिल्यास येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिंदे गटासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.


ही बातमी देखील वाचा...


काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण