Nagpur News : नैराश्यातून एका विद्यार्थिनीने (Student) गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे गळफास लावण्यापूर्वी तिने तिच्या संपूर्ण शरीरावर लिपस्टिक लावली होती. तिचा यामागे काय उद्देश होता हे समजू शकले नाही, मात्र सुसाईड नोटवरुन ती एकटी आणि निराश असल्याचे लक्षात येते. सानिका प्रवीण लाजुरकर (वय 18 वर्षे रा. शिव हाईट्स, पृथ्वीराजनगर)असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.


सानिकाचे वडील खासगी संस्थेत व्यवस्थापक आहेत आणि आई प्राध्यापिका आहे. तिला एक लहान बहीणही आहे. आई-वडील वर्धा येथे नोकरी करतात आणि लहान मुलीसह तेथेच राहतात. तिघेही वीकेंडला नागपुरात येत होते. सानिका मेडिकल प्रवेशाची तयारी करत होती. यासाठी कोचिंगचीही व्यवस्था करण्यात आली होती. सानिकाचे रात्री कुटुंबीयांशी बोलणे झाले होते. त्यावेळी ती सामान्यच होती. मात्र नंतर तिने अचानक गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यावरुन ती आनंदी होती आणि दु:खीही होती. तिने आपल्याला कोणीही मित्र नसल्याचाही उल्लेख केला होता. 


विशेष म्हणजे तिने आत्महत्येपूर्वी ओठांसोबतच संपूर्ण शरीर लिपस्टिकने रंगवले होते. ती शिकवणीला गैरहजर असल्याने सेंटरमधून आई-वडिलांना फोन करण्यात आला. त्यांनी याबाबत विचारपूस करण्यासाठी सानिकाला फोन लावला असता प्रतिसाद मिळाला नाही. आई-वडील तात्काळ नागपूरला आले. फ्लॅटचे दार आतमधून बंद होते. अनेकदा ठोठावल्यानंतरही उत्तर मिळाले नाही तर दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये जाताच सानिका गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. सुसाईड नोट जप्त करण्यात आली. वैद्यकीय चाचणीत शरीर लिपस्टिकने रंगवले असल्याची बाब समोर आली. तिने असे का केले हे कोणालाही माहिती नाही. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने लावला गळफास


याआधी सोनेगाव ठाण्यांतर्गत एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. अंकित सुरेश गुप्ता (वय 21 वर्षे) रा. गांगुली लेआऊट, सोमलवाडा असे मृताचे नाव आहे. अंकित काटोल मार्गावरील बी.एस.जैन महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचे वडील सुरेशही अभियंता आहेत. आई गृहिणी आहे आणि लहान भाऊही त्याच महाविद्यालयात शिकतो. रविवारी (11 डिसेंबर) मध्यरात्री अंकितने बेडरुममध्ये छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास लावला. सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी त्याला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून पोलिसांना माहिती दिली. सोनेगाव पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. चौकशीत अंकितला मानसिक आजार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तो कधीही कोणावरही एकदमच चिडत होता. गत दोन वर्षांपासून त्याचा उपचार सुरु होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे.


ही बातमी देखील वाचा


CBI Nagpur : आयकर विभागाचे 9 'मुन्नाभाई' गजाआड; डमी उमेदवार बसवून मिळवली होती नोकरी