Nagpur News : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (staff selection commission exam) परीक्षेत बोगस उमेदवाराच्या माध्यमातून आयकर विभागात (income tax department) भरती झालेल्या 9 कर्मचाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)च्या नागपूर शाखेने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर सीबीआयने प्रकरणाचा तपास करून या गोरखधंद्याचा भंडाफोड केला. सर्व नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी षडयंत्र, बोगस कागदपत्र बनवणे आणि फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. 


नागपूरच्या आयकर विभागाने दिल्या विविध जबाबदाऱ्या


अटकेतील आरोपींमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमार यांचा समावेश आहे. या सर्वांना नागपूरच्या आयकर विभागाने विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या. सीबीआयला मार्च 2018 मध्ये एक तक्रार मिळाली होती. यात 2012 ते 2014 दरम्यान कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेला काही लोकांनी बोगस उमेदवारांना बसवून परीक्षा उत्तीर्ण करीत आयकर विभागात नोकरी मिळविल्याचा आरोप लावण्यात आला होता. 


आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी


सीबीआयला (CBI) 12 कर्मचाऱ्यांची नावे मिळाली होती. सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. कर्मचारी निवड आयोगाला सर्व 12 उमेदवारांचे पेपर मागण्यात आले. संशयित उमेदवारांची सही, हस्तलिखित आणि बोटाचे ठसे घेण्यात आले. फॉरेंसिक तपासात 12 पैकी 9 कर्मचाऱ्यांच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी बोगस उमेदवार बसल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी सीबीआय नागपूरचे डीआयजी सलीम खान यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा तपास करणारे डीवायएसपी संदीप चोगले आणि त्यांच्या पथकाने सर्व 9 आरोपींना अटक केली. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.


बोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारेही लाटली होती नोकरी


जुलै 2022मध्ये राज्याच्या क्रीडा विश्वाला (Department of Education and Sports) हादरवणारी बातमी आली होती. राज्यातील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या लोकांची यादी महाराष्ट्र क्रीडा विभागाने जाहीर केली होती. यात 92 खेळाडू आहेत ज्यांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी लाटली होती. क्रीडा विभागाच्या प्रमाणपत्र पडताळणीत हे प्रमाणपत्र खोटे ठरले होते. या नावांची यादी महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर टाकली होती. एकूण 109 लोकांची ही यादी होती. इतकेच नव्हे तर यातील 17 खेळाडूंची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारस सुद्धा क्रीडा विभागाने केली होती.


ही बातमी देखील वाचा


Nagpur ST Bus : साई भक्तांसाठी एसटी महामंडळाची भेट; समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी 'नॉनस्टॉप' बससेवा, 'या' सवलतीही मिळणार