नागपूर :  सार्क देशांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे इंडोनेशियामधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या सडक्या व धोकादायक सुपारीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबादमधील 17 ठिकाणी चौकशी केली आहे. या प्रकरणात नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद मधील काही व्यापाऱ्यांनी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्र सरकारला शेकडो कोटींचा कस्टम ड्युटीचा चुना लावल्याचे समोर आले आहे.


सार्क संघटनेतील देशांसोबत भारताच्या व्यापारी करारानुसार भारतीय व्यापाऱ्यांनी सार्क देशातून सुपारीची आयात केली. तर त्या व्यवहारावर फक्त 13 टक्के कस्टम ड्युटी आहे. मात्र जर सार्क देशांच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून सुपारी आयात केली तर त्यावर तब्बल 113 टक्के कस्टम ड्युटी आहे. ही भरमसाठ कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी भारतातील काही व्यापारी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या काही अधिकाऱ्यांसोबत हात मिळवणी करून इंडोनेशियाची सुपारी सार्क देशातून आयात केल्याचे दर्शवत होते. त्यासाठी काही बनावट फर्म्सचा कागदोपत्री आधार घेतला जात होता. या व्यवहाराच्या माध्यमातून भारतीय व्यापाऱ्यांना इंडोनेशियामधील सडकी आणि आरोग्यसाठी धोकादायक सुपारीच्या आयातीवर तब्बल 100 टक्के कस्टम ड्युटी चुकवता येत होती.


काही दिवसांपूर्वी याच चोरट्या व्यापारासंदर्भात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली होती. तेव्हा न्यायालयाने या प्रकरणात सीबीआयला तपास करण्याचे निर्देश देत या प्रकरणी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजचे कोणते अधिकारी सहभागी आहेत हे निष्पन्न करण्याचे निर्देश दिले होते. त्याच मालिकेत आता सीबीआयच्या नागपूर युनिटच्या अधीक्षक निर्मला देवी यांच्या नेतृत्वात अनेक पथकांनी नागपुरात शांती नगर, चिखली लेआऊट, भावसार चौक आणि वर्धमान नगरात चार ठिकाणी व्यापारिक प्रतिष्ठानात चौकशी केली आहे.


 मुंबईत सात ठिकाणी, नवी मुंबईत तीन ठिकाणी तर अहमदाबादेत दोन ठिकाणी तपास मोहीम राबवून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी इंडोनेशियामधून सुपारीच्या आयात प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या बनावट फर्म्सबद्दल महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केले आहे. दरम्यान या घोटाळ्यात कस्टम ड्युटी चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांना कस्टम आणि सेंट्रल एक्साईजचे कोणते अधिकारी मदत करत होते हे अजून स्पष्ट झालेले नाही.  दरम्यान, हे प्रकरण फक्त कस्टम ड्युटीची चुकवेगिरी एवढ्यापुरते मर्यादित नाही तर इंडोनेशिया मधून आयात केली जाणारी सडकी सुपारी आरोग्यासाठी घातक असल्याचं माहिती असून त्या द्वारे गुटखा आणि खर्रा खाणाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे ही या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.