नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणखी सावध होण्याची गरज आहे. कारण विद्यापीठाने हिवाळी परीक्षेच्या काळात आलेले अनुभव आणि नुकतंच परीक्षेत कशा पद्धतीने कॉपी करता येईल याचे धडे देणारे काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परीक्षार्थींवर आणखी करडी नजर ठेवण्याचे ठरवले आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेत सुमारे 800 विद्यार्थ्यांचे पेपर ते ऑनलाईन परीक्षेसाठीच्या गाइलाईन्सचं उल्लंघन करत आल्यामुळे लॉक करावे लागले होते. ते कटू अनुभव विद्यापीठाच्या गाठीशी असतानाच काही लोकांनी विद्यापीठाचे ऑनलाईन परीक्षेचे पोर्टल आणि त्याची यंत्रणा कशी कमकुवत आहे हे दर्शविणारे व्हिडीओ बनवून परीक्षार्थी कशा स्वरूपात परीक्षेत कॉपी करू शकतील याचे मार्गदर्शन करणारे काही व्हिडीओ वायरल केले. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षेसाठीचे सर्व्हर दुप्पट क्षमतेचे केले आहे. त्यामुळे सर्व्हरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर ऑडिओ, व्हिडीओ आणि लोकेशनच्या स्वरूपात सतत दर काही सेकंदाने नजर ठेवलीच जाणार आहे. त्या शिवाय प्रॉक्टरिंग यंत्रणेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता सहा ऐवजी पाच संधीच मिळणार आहे. म्हणजे विद्यापीठाच्या गाइलाईन्सचे 5 पेक्षा जास्त उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांचे पेपर लॉक होणार आहे... मागील परीक्षेत प्रॉक्टरिंग यंत्रणेअंतर्गत ही मर्यादा सहा अशी होती.


ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याचे धडे 
कोरोना संक्रमणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होत असताना आता त्या ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याचे धडे ही ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. "द व्हिलेजर" आणि अशाच विविध टोपण नावाने काही व्हिडीओ युट्युब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वायरल होत आहेत. ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत कॉपी कशी करावी याचे मार्गच विद्यार्थ्यांना सुचवण्यात आले आहे. या वायरल व्हिडीओची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.


अशा पद्धतीने दिले जातात सल्ले 
'ऑनलाईन परीक्षा देताना तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या माईकवर टेप लावा आणि बिनधास्त मित्रांसह बोला. परीक्षा देण्यासाठी एक मोबाईल वापरा आणि दुसऱ्या मोबाईल ला स्क्रीनमध्ये दिसू न देता गुगल करून उत्तरे शोधा. काही सेकंदासाठी स्क्रीन समोरून उठून जा, मित्रांसोबत बोला आणि उत्तर लिहा.' असे एक ना अनेक सल्ले देणारे व्हिडीओ सध्या नागपुरात विद्यार्थ्यांमध्ये वायरल होत आहेत. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा सुरु होत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने चाळीस गुणांची ऑनलाईन परीक्षा घेणे सुरु केले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळ मिळतो. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा जवळपास पूर्ण झाल्या असून आता उन्हाळी परीक्षा 29 जून पासून सुरु होणार असून जवळपास साडे तीन लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व तयारी केली आहे. मात्र, त्या आधीच गेल्या काही आठवड्यांपासून नागपुरात विद्यार्थ्यांमध्ये काही व्हिडीओ प्रचंड वायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने विद्यार्थ्यांना परीक्षेत कशा पद्धतीने गैरप्रकार करता येतात याचे मार्गदर्शनच केलेले आहे.


पाच वेळे गैरकृत्य कराल ऑनलाईन सिस्टमनं पेपर लॉक 
नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या खास संकेतस्थळावर जाऊन त्याच्या मोबाईल किंवा कॉम्प्यूटरचे लोकेशन, कॅमेरा, माईक सुरु ठेवणे आवश्यक आहे. कारण त्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या हालचाली टिपल्या जातात आणि ते कॉपी तर करत नाही ना, एकत्रित बसून पेपर तर सोडवत नाहीत ना किंवा इतर गैरप्रकार तर करत नाही ना. या सर्वांवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची नजर असते. आता ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या त्या कथित व्हिडीओमध्ये विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलचा कॅमेरा बंद केला, लोकेशन बंद केले तरी काही होत नाही. माईक म्यूट ठेवले तरी काहीही होत नाही असे सुचविले गेले आहे. काहींनी ते विद्यार्थ्यांना तुम्ही काही सेकंड स्क्रीन समोरून उठले तरी काहीच होत नाही असे सल्लेही दिले आहे.  मात्र, परीक्षेत असे काहीही करण्याचे विचार मनात असेल तर आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं देखील तयारी केली आहे. कारण विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचे मार्ग सुचवणारा हा कथित व्हिडीओ मुळात विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा ठरणार आहे. कारण एका तासाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी कॅमेरा बंद ठेवणे, माईक म्यूट करणे, स्क्रिन बंद करणे, स्क्रीन समोरून उठून जाणे, कोणाशी बोलणे असे प्रकार करून कॉपी करण्याचे प्रयत्न केले. तर या सर्व गोष्टीची परीक्षा विभागाकडे त्वरित ऑनलाईन नोंद होते. आणि विद्यार्थ्याने एका पेपरमध्ये पाच वेळेला असे कृत्य केले तर ऑनलाईन सिस्टम त्याचे पेपर लॉक करते. 



विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांत जवळपास 800 वेळेला विद्यार्थ्यांची परीक्षा लॉक करण्याची वेळ आली. त्यामुळे कॉपी करण्याचे मार्ग सुचवणारा कथित व्यक्ती विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्याबद्दल चुकीचे मार्गच दाखवत नाहीये. तर तो त्यांचे नुकसान ही करत आहे. विशेष म्हणजे एका पेपर मध्ये पाच वेळेला नियमांचे उल्लंघन केल्यावर पेपर लॉक करण्याचे नियम विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच केले आहे.. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गाईडलाईन्स प्रमाणे ऑनलाईन परीक्षा द्यावी. अशा कोणत्याही वायरल व्हिडिओवर विश्वास ठेऊ नये.कारण त्यात सुचवलेल्या मार्गाचा अवलंब केल्यावर तुमची ऑनलाईन परीक्षाच लॉक होऊन तुमचे भवितव्य लॉक होऊ शकते.