नागपूर: जिल्ह्यातील उमरेड मकरधोकडा मार्गावर झाडी झुडपीत 13 मार्चला एक नर वाघ मृतावस्थेत आढळला होता. तीन वर्षांचा पूर्ण वाढलेला वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली होती. तेव्हा त्याचा मृत्यू वाघांच्या झुंजीत झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, वन विभागाच्या चौकशीत त्या वाघाचा मृत्यू तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वीज भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी तो विद्युत प्रवाह सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.
नुकतंच वन विभागाला वाघाचा शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यातून वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याने झाल्याचे समोर आले. ज्या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला होता, त्याच्या जवळच असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी तो विद्युत प्रवाह सोडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वन विभागाने तिघांना केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये छिंदवाडा जिल्ह्यातील भैय्यालाल दरसिमहा, मनकलाला दरसिमहा आणि दिलीप शीनू यांचा समावेश आहे.
वीटभट्टीवरील मजुरांनी जंगली डुकराची शिकार करून मांस खाल्ले अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या तिघांनी जंगली डुकराची शिकार करण्यासाठी कुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या तिघांनी पहिल्यांदाच विद्युत प्रवाह सोडून शिकार केली असे नाही. यापूर्वीही तिघांनी पाच वेळा याच पद्धतीने जंगली डुकराची शिकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यावेळी ही ते जंगली डुकराची शिकार करण्यात यशस्वी झाले होते, मात्र, त्यासोबत वाघ ही विद्युत प्रवाहामुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी दिली.
वन विभागाने शिकारीसाठी वापरलेले विद्युत तार आणि खुंट्या जप्त केल्या आहे. पुढील तपास नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहायक वन संरक्षक नरेंद्र चांदेवार, आरएफओ ए. के. मडावी आणि त्यांचे पथक करत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha