भंडारा : भागवत कथेच्या माध्यमातून संस्काराच्या गोष्टी सांगणाऱ्या भागवत कथाकार महाराजाने सप्ताह सुरु असलेल्या गावातील एका विवाहित महिलेला घेऊन पोबारा केला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील कुबाडा गावातील 35 वर्षीय महाराजाचे नाव दिनेश मोहतुरे असं आहे. भंडाराजवळच्या मोहदूरा येथे दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह कथाचे आयोजन 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले होते. या दरम्यान दिनेश मोहतुरे गावातील एका कुटुंबातच मुक्कामी थांबला होता. त्याच कुटुंबातील एका सुनेला महाराजाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि भागवत सप्ताह आटोपताच विवाहितेला घेवून महाराजांनी पलायन केले. या महाराजाविरुद्ध भंडारा शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


भंडाराजवळच्या मोहदूरा येथे उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता सदर महिलेचा पती पोलिसांच्या मदतीने महाराज आणि पत्नीचा शोध घेत आहे. मोहदूरा येथे दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह कथाचे आयोजन केले होते. दरवर्षी कथावाचन करणाऱ्या दिनेश मोहतुरे महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.



अशातच त्यांची नजर सप्ताहातील एका विवाहितेवर गेली. तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधत त्या विवाहितेला मोहपाशात अडकवले. 3 फेब्रुवारीला भागवत सप्ताहाचा समारोप झाला. मात्र पाच फेब्रुवारीला बुधवारी सायंकाळी महाराज सदर विवाहितेला घेऊन पळाले. विवाहिता घरी नसल्याची माहिती होताच शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नाही. विशेष म्हणजे विवाहितेला पाच वर्षांची मुलगीही आहे. महाराजांचेच हे कृत्य असावे, असा संशय कुटुंबीयांना आला. यानंतर भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांना सोबत घेऊन सदर विवाहितेच्या पतीने महाराजाचे मूळ गाव सावनेर तालुक्यातील कुबडा गाव गाठले. मात्र महाराज गावात आले नसल्याचे त्यांना कळाले. पोलीस महाराज आणि त्या विवाहितेचा शोध घेत आहेत.