नागपूर : साक्षगंधाचा कार्यक्रम आनंदाने आटोपून गावी परत जात असताना वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोटरसायकल वरून जाणाऱ्या दुचाकीस्वराला जोरात धडक दिली. ही धडक ( Road accidents )इतकी भीषण होती कि त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला . ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गावर गुरुवार 16 नोव्हेंबर च्या दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध भादंवि 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय.


गाडीचा चक्काचूर, तर दोन्ही दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू


रामटेक शहरात ( Ramtek City ) गुरुवारी जगदीश कोठे, रा. रेवराल, ता. मौदा यांचा मुलगा अंकित कोठे याच्या साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मृत चंद्रशेखर मुरलीधर कोठे (34) आणि दादाराम दिलीराग हारोडे (51) दोघेही कार्यक्रमासाठी रामटेक शहरात आले होते. कार्यक्रम आटपून दुपारी 3 वाजताच्या सुमारास आपल्या मोटरसायकलने रामटेकहून रेवराल येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान दोघेही रामटेक शहरापासून काही अंतरावर जाताच तुमसरहून रामटेकच्या दिशेने वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलच्या पुढच्या भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर चंद्रशेखर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा पाय तुटला गेला.  हा अपघात झाल्याचे लक्ष्यात येताच अज्ञात वाहनाने लगेच तिथून काढता पाय घेतला. दरम्यान वेळेत उपचार न मिळाल्याने या दोघांचाही मृत्यू झाला.


साक्षगंधाचा कार्यक्रम ठरला अखेरचा


सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र तो तोपर्यंत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध भादंवि 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. वाहनाच्या धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की मोटरसायकलच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघातातील मृत चंद्रशेखर कोठे हा जगदीश कोठे यांचा नातेवाईक होय. सक्षगंधाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असतानाच हा अपघात झाला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे आनंदावर विरजण पडले, तर दुसरीकडे रेवराल येथे शोककळा पसरली होती.


हेही वाचा : 


Nanded Crime News : दहशतवादी रिंदाच्या नावाने पाच लाख रूपये खंडणी मागितली; नांदेड पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या