नांदेड :  दहशतवादी हरविंदरसिंग रिंदाच्या (Harvindar Singh Rinda) नावाने एका व्यापाऱ्याला पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नांदेड ग्रामीण पोलिसांनी (Nanded Police) ही कारवाई केली. 


नांदेडमधील कौठा भागातील एका ब्युटीपार्लर व्यावसायिकाला 12 नोव्हेंबर रोजी वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून फोन कॉल आले होते. या वेळी फोन करणाऱ्यांनी रिंदाचे नाव घेवून मैं रिंदा बोल रहा हूं आज रात नऊ बजे तक रूपये पाच लाख रेडी रखना और पोलीस मे कम्प्लेंट दिया तो तेरी खैर नही तेरे औरे तेरे बच्चे के तुकडे कर दुंगा, अशी धमकी दिली आणि पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. 


या धमकीच्या अनुषंगाने व्यापाऱ्याने नांदेड ग्रामीण येथे 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण यांनी केला. तपासा दरम्यान त्यांनी गुन्हयातील संशयित आरोपी अमित अनिल सवामचन (वय 21 रा. वाल्मिक नगर, नांदेड) आणि जसप्रितसिंग प्रतापसिंग मठाळू (वय 20 रा. गुरुद्वारा गेट नं. 1 नांदेड) या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी मिळून पैशाच्या  लोभापोटी व्यापाऱ्यास वेगवेगळ्या मोबाईलवरून पैशाची मागणी केली होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


धमकीचे कॉल आल्यास पोलिसांशी संपर्क करा 


नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना असे कोणतेही धमकीचे कॉल आल्यास पोलिसांशी संपर्क साधाण्याचे आवाहन  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.


'खून का बदला खून से'; भावाची हत्या करणाऱ्याच्या भावाला संपवलं; नांदेड शहर हादरलं


एकीकडे देशभरात मोठ्या आनंदात दिवाळी (Diwali) साजरी केली जात असतांना, तिकडे नांदेड (Nanded) शहर एका खुनाच्या (Murder) घटनेने हादरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एमजीएम महाविद्यालय परिसरातील विस्तारित नाथनगर येथे ही घटना घडली. भरत हरिसिंग पवार (रा. विस्तारित नाथनगर, नांदेड) असे मयताचे नाव असून, विश्वास शिंदे असे आरोपीचे नाव आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी विश्वास शिंदे याच्या भावाचा खून भरत पवार याच्या भावाने केला होता. त्यामुळे याचा राग विश्वासच्या मनात होता. तसेच, त्याने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार, खुनाचा वचपा घेण्यासाठी विश्वास शिंदे सर्वत्र धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन सुरू असताना भरत पवारच्या घराजवळ पोहचला. तसेच, भरत पवारला त्याच्या घराजवळ आपल्या अन्य दोन साथीदारासह घेरले. त्यानंतर खंजरने भरतवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.