Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेला अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले असून देशभर जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. देशभरातील सर्व मंदिर आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे. अशातच नागपूर शहरातील (Nagpur) ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातही मोठा उत्सव साजरा होणार आहे.


सुमारे दीड लाख दीपज्योतींनी उजळणार मंदिर परिसर 


नागपुरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे 22 जानेवारीला मंदिर परिसर सुमारे दीड लाख दीपज्योतींनी उजळणार आहे. या दीपज्योतीच्या माध्यमातून अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती, रामदरबार, धर्मरक्षक राम यांची आकृती आकारण्यात येणार आहे. अयोध्येच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त साजरा होणारा दीपोत्सव हा नागपूरकरांसाठी नेत्रदीपक ठरणार आहे.


त्याचबरोबर मंदिर कमिटीच्या वतीने सोमवारी पहाटे 5.30 वाजेपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे प्रभू श्रीरामाचा अभिषेक होणार आहे. त्यानंतर श्रृंगार आरती, भगवान शिवाचा रुद्राभिषेक, सकाळी 8 वाजता सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण सोबतच 'श्रीराम जयराम जय जय राम'ची जयघोष सर्वत्र होणार आहे. 


अयोध्येच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण


नागपुरातील बजेरिया महिला समाजातर्फे मंदिरात मंगल गीतगायन होणार आहे. त्याचप्रमाणे 22 जानेवारीला दुपारी 12 वाजेपासून अयोध्येच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण होणार आहे. या सोहळ्यासाठी सभामंडप आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. सध्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 22 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजतापासून दीड लाख दीपांचा दीपोत्सव होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहातही दीपज्योतीच्या प्रकाशात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिराचा परिसरात दीपज्योतीच्या माध्यमातून विविध आकृती साकारण्यात येणार आहे. 


108 दिप दीपज्योतींनी महाआरतीसह विविध कार्यक्रम  


दीपोत्सव सोबतच 22 जानेवारीला दुपारी सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत पांचजन्य शंख वादक दलाचे सूरज घुमारे यांच्या नेतृत्वात धर्माचा शंखनाद होणार आहे. सायंकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर 108 दीपज्योतींनी महाआरती होणार आहे. या सोबतच एक विशेष आकर्षण म्हणजे रामायणातील जे पात्र फार परिचित नाहीत, अशा पात्रांचे प्रभू श्रीरामाच्या जीवनातील महत्त्व सायंकाळी 5 वाजतापासून डॉ. विजेंद्र बत्रा सादर करणार आहेत.