Weather Update Today : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate Chnage) होत आहे. बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र आहे.  विदर्भात (Vidarbha) येत्या काही दिवसात थंडीचा (Winter) जोर ओसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच शनिवारी 20 जानेवारीला विदर्भातील काही भागात रात्रीच्या सुमारास झालेल्या तुरळक पावसामुळे हवेत गारठा वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात ढग दाटून येत आहेत. 22 जानेवारीनंतर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच तुरळक पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा वाढला आहे. 

पुढील तीन दिवस पूर्व विदर्भात पावसाचा इशारा 

बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरलं आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील भागात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. त्याचा परिणाम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जाणवर असल्याने पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर पुन्हा ढग दाटून येण्याची शक्यता आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. या प्रभावाने येत्या 22, 23 आणि 24 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पावसाळी वातावरणामुळे तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर येत्या 22 जानेवारीला विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरला पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 23 जानेवारीला गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया तसेच 24 जानेवारीला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.  

भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी 

मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. 20 जानेवारीला रात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील काही भागात अचानक अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं दुचाकी वाहनचालकांची मोठी तारांबळ उडल्याचं चित्र बघायला मिळालं. काहीकाळ पडलेल्या हा पाऊस पिकांना लाभदायक ठरला आहे. अवकाळी पावसामुळं मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


असे आहे विदर्भाचे तापमान

जिल्हे           कमाल किमान
अकोला             30.8 15.5
अमरावती 29.4 15.5
बुलढाणा 29.2 12.8
ब्रम्हपुरी       30.4 18.6
चंद्रपूर     30.4 15.0
गडचिरोली      29.4  15.2 
गोंदिया               27.5 14.5
नागपूर                29.0 16.5 
वर्धा                   29.2   17.2
वाशिम                31.2  14.2 
यवतमाळ            31.0 15.5

 

व्हायरल रोगांचा वाढता धोका

वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे व्हायरल इन्फेक्शन आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांना त्यांच्या श्‍वसनसंस्थेत समस्या येत आहेत. तसेच हृदयविकाराच्या झटका येणाच्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

इतर संबंधित बातम्या