नागपूर : शहरातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आकस्मिक रोग विभाग म्हणजेच कॅज्युल्टीमध्ये कोरोना सदृश रुग्णांची संख्या वाढल्यामुळे एका खाटेवर दोन रुग्णांना झोपवण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर भाजपने नागपुरात शासन प्रशासन मधील समन्वयाचा अभाव नागपूरकरांच्या जीवावर उठल्याचा आरोप केला आहे. तर रुग्णालय प्रशासनाने त्यासंदर्भात मौन बाळगले आहे. दरम्यान महापालिकेने मात्र शहरात पुरेशा प्रमाणात बेड्स उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.
नागपूरच्या गरीब रुग्णांसाठी सर्वात मोठा आशास्थान असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आकस्मिक रुग्ण विभागातील दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात. यात सर्दी, खोकला, ताप आणि तत्सम लक्षणे असलेले रुग्ण आहेत. यापैकी अनेकांना श्वसनाचा त्रास असल्याने त्यांना आधीच ऑक्सिजनही लावण्यात आली आहे. मात्र, वार्डात रुग्णांची एवढी गर्दी झाली आहे की रुग्णालयातील डॉक्टर एका बेडवर दोन दोन रुग्णांना झोपवण्यास हतबल झाले आहेत. कुठे एका बेडवर दोन रुग्ण बसून आहेत तर कुठे एकाच बेडवर दोन रुग्ण एकमेकांच्या विपरीत दिशेने डोके ठेऊन झोपले आहेत. सध्या नागपुरात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. काल नागपूर जिल्ह्यात 3 हजार 579 कोरोना बाधित रुग्ण होते. त्यामध्ये एकट्या नागपूर शहराचा वाटा 2 हजार 597 एवढा प्रचंड होता. नागपूर शहरात कोरोनाचा शिरकाव गल्लोगल्ली झाल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयावरचा भार प्रचंड वाढला आहे. कोरोना रुग्णांचे वार्ड तर फुल्ल झालेच आहे. आकस्मिक रुग्ण विभागही कोरोना सदृश लक्षणे असलेल्यांमुळे फुल्ल आहेत.
भाजपची सत्ताधाऱ्यांवर टीका
दरम्यान, विरोधी पक्षाने या स्थिती संदर्भात नागपुरातील तिन्ही मंत्र्यांना जबाबदार मानत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नागपुरात कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना नागपूरचे पालकमंत्री तामिळनाडूत पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत तर गृहमंत्री स्वतःची खुर्ची वाचवत असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शासन आणि प्रशासन यांच्यात गेल्या काही महिन्यातील समन्वयाचा अभाव हेच नागपुरातील सध्याच्या स्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
दुसऱ्या बाजूला महापालिकेने शासकीय रुग्णालयांवरील वाढलेला भार लक्षात घेता शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांसाठी अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करणे सुरु केले आहे. महापालिकेचा दावा आहे की सध्या नागपुरातील 79 खाजगी रुग्णालयात 2 हजार 936 बेड्स कोरोना बाधितांसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी 1 हजार 839 बेड्स ऑक्सिजनयुक्त असून 994 बेड्स आयसीयूचे आहेत तर 261 व्हेंटिलेटर ही खाजगी रुग्णालयात आहेत. दुसऱ्या बाजूला शहरात 8 शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांसाठी एकूण 1 हजार 515 बेड्स आहेत. त्यामध्ये 1 हजार 152 बेड्स ऑक्सिजन युक्त असून 319 बेड्स आयसीयू सोयीचे आहेत. तर सरकारी रुग्णालयात 271 व्हेंटिलेटर आहेत. दरम्यान, मनपाच्या आकडेवारीनुसार यापैकी बहुतांशी बेड्स (सुमारे 90 टक्के) आधीच रुग्णांच्या सेवेत आहेत.
महापालिकेनुसार नागपुरात आज कोरोनाबाधितांसाठी असेल्या बेड्सची संख्या (कंसात रिकाम्या बेड्सची संख्या)
शासकीय हॉस्पिटल खासगी हॉस्पिटल
बेड्सची एकूण संख्या 1515 2936
ऑक्सिजन बेड 1152 (187) 1839 (146)
आयसीयू 319 (74) 994 (42)
व्हेटिलेटर 271 (84) 261 (15)
आज उपलब्ध असलेले बेड्स - 333 ऑक्सजीन युक्त
116 आयसीयू,
99 व्हेंटिलेटर
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी नागपुरात कोरोना बाधितांसाठी जेवढे बेड्स उपलब्ध होते, ते सर्व दुसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन आधीच तयार ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट जास्त मोठी असल्याने आम्ही आता बेड्सची संख्या सातत्याने वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आल्याचा मनपाचा दावा आहे. दरम्यान, रुग्णालयात बेड्स उपलब्ध असतील तर कोणत्याही परिस्थितीत सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांनी रुग्णांना परत पाठवू नये, असे स्पष्ट निर्देश रुग्णालयांना देण्यात आल्याचेही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले आहे.