नागपूर : राज्याच्या राजकारणात सध्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपुरातील वयोवृद्ध आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्या प्रकरणातही समोरासमोर आले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ आंदोलन करत एकनाथ निमगडे यांच्या हत्येत काही भाजप नेत्यांच्या जवळच्या लोकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. 


या प्रकरणी पोलिसांच्या तपासात ज्या रणजित सफेलकर नावाच्या गुंडांचा नाव समोर आलं आहे. तो अनेक भाजप नेत्यांच्या जवळचा आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. तसेच फडणवीस यांच्या निकटवर्तीय असल्याचा दावा करणाऱ्या कुमार नावाच्या व्यक्तीने निमगडे यांना काही वर्षांपूर्वी जमिनीबद्दल फोन केला होता असा दावाही राष्ट्रवादीने केला आहे. दरम्यान, भाजपने तडकाफडकी हे सर्व आरोप फेटाळले आहे. गृहविभाग आधीच राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे गृहविभागाने या घटनेचा सखोल तपास करावा आणि सत्य समोर आणावे, अशी मागणी भाजपने केली आहे. 


गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा प्रतिहल्ला भाजपने केला आहे. दरम्यान, एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात भाजप नेत्यांची चौकशी करा, अशी मागणी करतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर युनिटमध्ये एकी नसल्याचे आज दिसून आले. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, आभा पांडे, नूतन रेवतकर हे सर्व महत्वाचे नेते अनुपस्थित राहिले. दुसरीकडे पोलिसांनी निमगडे यांच्या हत्येचा प्रकरणात कालू हाटे, नवाब अश्रफी उर्फ नब्बू सह तीन आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी रणजित सफेलकर अजूनही फरार आहे. दरम्यान, निमगडे यांच्या हत्येची सुपारी नेमकी दिली कोणी होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.   


काय होतं प्रकरण? 
6 सप्टेंबर 2016 रोजी आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या झाली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या 72 वर्षांच्या निमगडे यांच्यावर मिर्जा गल्लीत अज्ञात आरोपींकडून गोळीबार झाला होता. त्यात निमगडे यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून हत्येचा खुलासा होऊ शकला नव्हता. तपासात खूप प्रगती होत नाही हे पाहून निमगडे कुटुंबियांनी एकनाथ निमगडे यांच्या हत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर एकनाथ निमगडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे वर्ग झाला होता. 


गेली चार वर्षे सीबीआयलाही या तपासात कुठलेच यश आले नव्हते. नुकतच नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तपास न लागलेल्या हत्या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू केला होता. गुन्हे शाखेने एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाबद्दल शंका असलेल्या सर्व गुन्हेगारांवर नजर ठेवली होती. काही गुन्हेगारांच्या चौकशीदरम्यान एकनाथ निमगडे यांची हत्या नागपूर वर्धा रोडवरील कोट्यवधी रुपयांच्या एका जमीन प्रकरणामुळे झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी काही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली होती. त्या चौकशीमध्ये नागपूरचा कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा साथीदार कालू हाटे या दोघांनी एका अज्ञात व्यक्तीकडून एकनाथ निमगडे यांच्या हत्येची सुपारी 5 कोटी रुपयात घेतली होती. त्यानंतर रणजित सफेलकरने नागपूरचा गुंड नवाब उर्फ नब्बू अश्रफी मार्फत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या काही शूटर्सला वापरून 6 सप्टेंबर 2016 रोजी एकनाथ निमगडे यांची हत्या घडवून आणली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास लागलेला नव्हता. आता नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत रणजीत सफेलकर या प्रकरणा मागचा मास्टर माईंड (सुपारी किलर) असल्याचे समोर आणला आणि अकरा गुन्हेगारांना या प्रकरणी आरोपी केलं आहे. मात्र, सध्या रणजीत सफेलकर आणि त्याचे बहुतांशी सहकारी फरार आहेत.