नागपूर : पोलिस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनमध्ये बसून शानदारपणे 'टिकटॉक' व्हिडीओ तयार करणाऱ्या नागपुरातील गुंडाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिस व्हॅनमधला 'टिकटॉक' व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन खळबळ उडवणारा कुख्यात गुंड सय्यद मोबीन अहमद याला नागपूर पोलिसांनी अखेर अटक केली.


नागपूरच्या 'चामा' गँगचा म्होरक्या आणि गोवंश तस्करीसह चारचाकी वाहनचोरीच्या अनेक प्रकारणांमध्ये सय्यद मोबीन अहमदचा सहभाग राहिला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सय्यद मोबिन अहमदने चक्क पोलिस व्हॅनमध्येच व्हिडीओ काढल्यामुळे नागपूर पोलिसांचं हसं झालं होतं. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

नागपुरातील कोराडी पोलिस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनमध्ये त्याने हा व्हिडीओ शूट केला. त्याला केजीएफ या चित्रपटाचं संगीत आणि संवाद लावून टिकटॉकवर पोस्टही केला.



पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार सय्यद मोबीन अहमदचा तथाकथित व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यात शूट करण्यात आला आहे. तेव्हा पोलिस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या व्हॅनमध्ये बसून हे व्हिडीओ शूट करुन देण्यात काही पोलिस कर्मचाऱ्यांनीही मदत केली होती का, याचा तपासही केला जात आहे.

VIDEO | नागपुरात विकृत प्रेमासाठी मुलीनंच आईवडिलांना संपवलं | स्पेशल रिपोर्ट | नागपूर



जर या प्रकरणात पोलिस कमर्चाऱ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग समोर आला, तर त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाईल अशी माहिती संबंधित झोनचे पोलीस उपायुक्त/डीसीपी हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात सय्यद मोबीन अहमदवर नागपूर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र तरी तो नागपूरच्या बाहेर जाण्याऐवजी नागपुरातच फिरत होता. हद्दपारीची नोटीस बजावण्यासाठी आम्ही त्याचा शोध घेत होतो, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता, असंही पोद्दार म्हणाले.

सय्यद मोबीन अहमद आज सकाळी स्वतः डीसीपी कार्यालयात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सय्यद मोबीन अहमद विरोधात 2010 पासून गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो नागपुरात गोवंश तस्करीचा मुख्य गुन्हेगार बनला होता. तसेच त्याच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यात दोन पोलीस स्टेशन्समध्ये हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.