नागपूर : प्रसिद्ध फूड प्रोडक्ट हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात पालीचं पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकाने मागवलेल्या मेदूवड्या सोबत आलेल्या सांबरमध्ये हे पालीचं पिल्लू आढळलं आहे. शहरातील अजनी चौकातील हल्दीरामच्या आऊटलेटमध्ये हा प्रकार घडला आहे.

Continues below advertisement


वर्ध्यातील यश अग्निहोत्री हल्दीरामच्या आऊटलेटमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी मेदूवडा ऑर्डर केला. त्यांनी ऑर्डर केलेल्या मेदूवड्यासोबत मिळालेल्या सांबरमध्ये हे पालीचे पिल्लू मृतावस्थेत आढळलं. घटनेनंतर ग्राहक यश अग्निहोत्रींच्या कुटुंबातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


यश अग्निहोत्री यांनी ऑर्डर केलेल्या सांबरमध्ये पालीचं पिल्लू असल्याचं फोटोत स्पष्ट दिसत आहे. याशिवाय अग्निहोत्री यांच्याकडे त्यांनी ऑर्डर केलेल्या पदार्थाचं बिल देखील आहे. याप्रकरणी आता अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.


हल्दीरामचे खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. हल्दीरामचं नाव मोठं असल्याने पाल निघाल्याची बातमीही वाऱ्यासारखी पसरली आहे. याप्रकरणी हल्दीरामच्या आऊटलेटवर काय कारवाई होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.