नागपूर : काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात माकडीण पासून दुरावलेल्या तिच्या पिल्ल्याची बातमी एबीपी माझाने दाखविली होती. नागपूरच्या वन्य जीव उपचार केंद्रात आईपासून दुरावल्यामुळे एकटं पडलेलं माकडाचं हे पिल्लू दिवसाचा बराच वेळ कोणतीही हालचाल न करता निष्क्रियच राहायचं. मात्र आता त्यात आमूलाग्र बदल होऊन ते भलतेच सक्रिय झाले आहे. कारण त्याला एक खास मित्र भेटला आहे. एका हरिणीपासून दुरावलेलं हरणाचं एक लहान पाडस सध्या या माकडाच्या पिल्लाचा सर्वात खास मित्र बनला असून दोघांची ही मैत्री सध्या चर्चेत आहे. शिवाय माकडाच्या पिल्लाला खास डिजिटल ट्रेनिंग ही देण्यात येत आहे.


लॉकडाऊनच्या काळात हिंगणा परिसरात लोकांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या त्याच्या आईला ( माकडीण ) उपचारानंतर वन विभागाने वनात सोडले. मात्र, त्यावेळी माकडीण या पिल्लाला सोबत घेऊन नाही गेली. त्यामुळे तेव्हापासून आईपासून दुरावलेलं माकडाचं हे पिल्लू वन्य वीज उपचार केंद्रात एकटं पडलं होतं. दिवसभर एखाद्या सॉफ्ट टॉयला आपली आई समजून बिलगून राहणे किंवा उपचार केंद्रातील काही निवडक कर्मचाऱ्यांना बिलगून राहणे हेच त्याचे दिनक्रम होते.



मात्र, काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून हरणाचं एक पाडस ही तशाच अवस्थेत सापडलां. या पाडसाची आई त्याच्यापासून दुरावल्यामुळे त्याला ही वन्य जीव उपचार केंद्रात आणण्यात आले. आता आपापल्या आईपासून दुरावलेल्या या दोन्ही पिल्लांना एकमेकांची साथ मिळाली आहे. दोघे एकमेकांच्या साथीने मोठे होत आहेत. विशेष म्हणजे हरणाचं पाडस आल्यानंतर आधी जवळपास निष्क्रिय असलेलं, दिवसभर सॉफ्ट टॉयला बिलगून झोपणारं माकडाचा पिल्लू ही फार सक्रिय झालं आहे. मित्राच्या सोबतीने त्याची खुराक वाढली आहे आणि त्यामुळे त्याची वाढ ही चांगली होत आहे. दोन्ही पिल्लं सध्या एकमेकांच्या सोबतीने नुसते खेळतच नाहीये तर घरात दोन भावंडे एखाद्या वस्तूसाठी जसे भांडतात तसे भांडण ही करतायेत.



दरम्यान, भविष्यात माकडाच्या पिल्लाला वनात सोडण्यासाठी उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्याची एका वेगळ्या पद्धतीने डिजिटल ट्रेनिंग ही सुरु केली आहे. त्याला मोबाईल स्क्रीनवर त्याच्या आईचे एक व्हिडीओ दाखविले जात आहे. शिवाय जंगलात मोकाट असलेल्या माकडाच्या कळपाचे व्हिडीओ दाखवून त्याला माकडांच्या विविध सवयीशी, जीवन पद्धतीशी परिचित केले जात आहे. विशेष म्हणजे माकडाचं हा पिल्लू या डिजिटल ट्रेनिंगला चांगला प्रतिसाद देत आहे. तो नुसता कुतूहलाने मोबाईलकडे पाहत नाहीये तर तो मोबाईल स्क्रीनवर दिसणाऱ्या माकडांच्या हालचालींना प्रतिसाद ही देत आहे.



नागपुरात वन विभागाच्या या वन्य जीव बचाव केंद्रात त्यांच्या आईने काही कारणामुळे त्यागलेल्या या दोन्ही पिल्लांची सध्या देखभाल केली जात आहे. तसेच आता दोघांना एकमेकांची साथ मिळाल्यामुळे दोन्ही मित्रांची चांगली वाढ होत आहे. वन विभागासाठी खरं आव्हान तेव्हा निर्माण होईल जेव्हा या दोघांना निसर्गात पुन्हा सोडावे लागणार. त्यासाठीच या दोघांना एकमेकांच्या सोबतीने सध्या तयार केले जात आहे.