नागपूर : पोलिसांकडे नेहमीच वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी घेऊन लोक न्यायाच्या अपेक्षेने येतात. मात्र, नागपुरात एका तरुणाच्या तक्रारीने पोलिसांनाच चक्रावून सोडलं आहे. तरुणाने केलेल्या या तक्रारीवर सल्लामसलत करुन आता पोलीस अधिकाऱ्यांनीच तरुणासमोर हात जोडत, या समस्येवर आमच्याकडे उपाय नसल्याचं सांगून पिच्छा सोडवला.


"दिल चोरी साड्डा हो गया..." किंवा "चुरा लिया है तुमने जो दिल को...." हिंदी चित्रपटातील ही गाणे तुम्ही अनेक वेळा ऐकली असाल. मात्र, नागपुरात एका महाविद्यालयीन तरुणाने काहीशी अशाच आशयाची तक्रार पोलिसांकडे केली. एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या या पठ्ठ्याने पोलिसांकडे तक्रार दिली की संबंधित तरुणीने माझं मन/हृदय चोरलं आहे. मात्र, आता ती त्याच्यापासून नजर चोरत आहे. आता पोलिसांनी त्याचा चोरी गेलेला दिल/मन परत मिळवून द्यावा."

तरुणाच्या या जगावेगळ्या तक्रारीमुळे पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आणि त्यांनी वरिष्ठांकडे जेव्हा मार्गदर्शनाची विनंती केली, तर तेही गोंधळले. आपापसात चर्चा केल्यानंतर हे पोलिसांचे विषय आणि कार्यक्षेत्र नाही, असं दिल/मन चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्या तरुणाला कळवण्यात आलं.

दरम्यान, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते दिल/मन चोरी झाल्याची तक्रार पोलिसांपर्यंत घेऊन जाणाऱ्या तरुणाची मनस्थिती ही समजून घेण्याची गरज आहे. एकतर तो लोकांचा आणि त्या तरुणीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी असं कृत्य करत असावा. किंवा लाडात आणि खूप सुखसोयीमध्ये वाढल्यामुळे त्याला नकार ऐकण्याची सवयच नसावी. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते नकार ऐकून घेतल्यानंतर असे वर्तन करणाऱ्या तरुणाच्या पालकांनी त्याच्या वर्तनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये नकार पचवण्याची क्षमता फार मोजक्या तरुणांमध्येच असते काळजी करण्याची गरज आहे.

प्रेम आंधळं असतं. त्यात प्रेमात आकंठ बुडालेले अनेक प्रेमवीर आपलं प्रेम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. मात्र, प्रेमात अपयश येत असल्याचं पाहून थेट पोलिसांच्या दारापर्यंत पोहोचणारा हा प्रेमवीर सर्वांपेक्षा हटकेच म्हणावा लागेल आणि त्यामुळेच सध्या नागपुरात त्याची सर्वत्र चर्चा आहे.