Nagpur : उत्तर नागपुरातील (South Nagpur) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला जानेवारी 2022 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. यासाठी 1165 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संस्थेच्या उभारणीसंदर्भात शासनाच्या विशेष समितीने येथे तीन वेळा भेटी देऊन जागेची पाहणी केली. मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प अधांतरी अडकला आहे. धक्कादायक म्हणजे सतरा वर्षापूर्वी इथे वैद्यकीय सेवा सुरु झाली. मात्र, येथे कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे.


माजी ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut) यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 2005 पासून येथे केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे. या रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प 2014 पासून खऱ्या अर्थाने अजेंड्यावर आला. 2015 मध्ये राज्यात सत्ता बदलानंतर या रुग्णालयावर अवकळा पसरली. 2019 मध्ये महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेवर आले. पुन्हा एकदा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या आशा पल्लवित झाल्या. 615 खाटांचे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम आणि रुग्णालय असा प्रकल्प तयार केला. 1165 कोटीतून हा प्रकल्प उभा राहणार होता. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर पूर्ण करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली आहे. मात्र पुन्हा सत्ताबदल झाला आणि हा प्रकल्प थंडबस्त्यात आहे. 


डॉक्टरांना दर 4 महिन्यांनी नवा कार्यादेश


विविध विभागाचे 9 वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेत कार्यरत आहेत. रुग्णालय सुरु होऊन 17 वर्षे  झाली. मात्र, रुग्णालय आज आधी होते, तसेच आहे. रंगरंगोटीही झाली नाही. कार्यरत असलेले सर्व 9 डॉक्टर कंत्राटीवर आहे. त्यांना दर चार महिन्यांनी नवीन कार्यादेश मिळतो. यामुळे या भागातील रुग्णांना डॉ. आंबेडकर रुग्णालयात अद्यापही केवळ तपासणीपुरता लाभ मिळत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे. 


श्रेणीवर्धनासाठी निधीची प्रतीक्षा 


प्रस्तावित डॉ.आंबेडकर रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या श्रेणीवर्धन करताना येथील 7.56 एकर जागेवर नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार आहे. 8.50 एकर जागेवर कर्मचाऱ्यांसाठी संकुल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. तर कार्डिऑलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र, हिमटोलॉजी हे सहा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम येथे प्रस्तावित करण्यात आले होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध वैद्यकशास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, त्वचा व गुप्तरोग, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, रक्तपेढी, जीव रसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, शल्य चिकित्साशास्त्र, अस्थी व्यंगपोचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, नाक-कान-घसाशास्त्र, नेत्रशल्य चिकित्साशास्त्र, रुग्णालयीन प्रशासन, इमर्जन्सी मेडिसिन इत्यादी 17 पदव्युत्तर व 11 डिम अतिविशेषोपचार अभ्यासक्रम प्रस्तावित होते. मात्र निधीची प्रतीक्षा आहे.


ही बातमी देखील वाचा


Indian Science Congress : 'हॉस्टेल'चे बनवणार गेस्ट हाऊस! परीक्षेच्या काळात नागपूर विद्यापीठाच्या अजब निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष