नागपूर : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law) पुकारलेल्या संपामुळे नागपुरातील पेट्रोल पंपावर काल रात्रीपासून नागरिकांची एकच झुंबड केल्याचे बघायला मिळाले. शहरात पेट्रोल पंपावर (Petrol Pump) मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल आणि  गॅस डिलर असोशिएशनचे  नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींची  बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डीझेल आणि गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक इंधनसाठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, लवकरच  परिस्थिती सुधारेल. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक 


 नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी आज पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल व गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींची सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये पेट्रोल, डिझल आणि गॅस डिलर असोशिएशनने नमूद केले की, सदर संपाला आमचा पाठिंबा नसून आम्ही स्वतःच्या टँकरने इंधन पुरवू, असा विश्वास  त्यांनी या बैठकीत दिला. या बैठकीनंतर नागपूर पोलीस आयुक्तांशी देखील त्यांनी परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पेट्रोल डिझेल व गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे पोलीस संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी  टँकर धारकांना पोलीस संरक्षणाची हमी दिली आहे. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माध्यमांसाठी एक व्हिडिओ प्रसारित करत नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, लवकरच  परिस्थिती सुधारेल. असे आवाहन केले आहे.


काय म्हणाले जिल्हाधिकारी ? 


नागपुर जिल्ह्यात कुठेही पेट्रोल डिझेल आणि गॅसची टंचाई नसून सर्व इंधन डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत गोंधळून जाऊ नये. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडून पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर गर्दी करू नये. समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका,  ज्या ठिकाणी अतिरिक्त मागणीमुळे पेट्रोल संपले असेल त्या ठिकाणचा पेट्रोल पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल. तसेच आवश्यकता नसेल तर गॅस सिलेंडरचे देखील बुकिंग करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गॅसचासाठा मुबलक उपलब्ध आहे. यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणाऱ्या ट्रक ,टेम्पोला तसेच रुग्णवाहिकांना अडथळा होणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.  लवकरच परिस्थिति सुधारेल असे देखील  इटनकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे.  


हे ही वाचा :