Truck Driver Strike : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law) पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका आता सर्वसामान्यांच्या लालपरीच्या (ST Bus) वाहतुकीवर देखील होतांना दिसतो आहे. या संपामुळे विदर्भातील एसटी वाहतूक ठप्प झाली असून अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहे. अशात आता विदर्भातील एसटीला मोजकेच दिवस पुरवठा करता येईल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे. विदर्भात  एसटी(ST Bus)  बसेस साठी दररोज 2 लाख लिटर डिझेल लागत असून सध्या विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस एसटी सुरळीत धावू शकेल अशी सध्याची स्थिती आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढांच डिझेलसाठा असल्याने नागपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटींना तिथून डिझेल भरून येण्याची सूचना एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिल्या आहेत.


 ....तर एसटीची थांबतील चाके 


नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल-डीझेलची टंचाई निर्माण झाली आहे. अशात आता एसटी बसेस साठी लागणारे डिझेल सध्या ऑइल कंपन्यांच्या डेपो मधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये तो डिझेल एसटीच्या विविध डेपोपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी एसटी प्रशासनानं संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती  गभने यांनी दिली आहे. ट्रक आणि टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला तर नक्कीच सर्वसामान्यांचा प्रवासाचा माध्यम असलेल्या एसटीची चाके थांबतील अशी चिन्हे आहेत.


एसटीची वाहतूकीवर परिणाम


केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामुळे राज्यातील पेट्रोलपंपांचा इंधन साठा संपला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे नागपूर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंपावर असलेलं पेट्रोल संपेल या भीतीपोटी पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारक पेट्रोल पंपावर गर्दी करू लागले आहेत. अशात अनेक महामार्ग या आंदोलकांनी अडवून धरल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्याची जीवनदायनी असलेल्या एसटी वाहतुकीवर देखील होतो आहे. या संपामुळे विदर्भातील  वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि भंडारा मार्गावरची एसटी सेवा प्रभावित झाली आहे. एवढेच नव्हे तर काल नागपूरहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या छिंदवाडा, शिवणी, इंदोर, राजनांदगाव, गोंदिया मार्गावरच्या बस फेऱ्याही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे एसटी प्रशासनाचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


एसटीच्या सर्व आगारांमध्ये किमान दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा


सध्या राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये कमीत कमी दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. ट्रक आणि टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला तर नक्कीच सर्वसामान्यांचा प्रवासाचा माध्यम असलेल्या एसटीची चाके थांबतील अशी चिन्हे आहेत.   त्यामुळे देवदर्शनावरुन परतणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 


हे ही वाचा :