नागपूर:  प्रेमात, नैराश्यात तरुणांनी धक्कादायक पाऊलं उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक भयंकर प्रकार नाागपूरमध्ये  समोर आला आहे. नागपूर (Nagpur Crime News) जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात एका तरुण-तरूणीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. ते प्रेमीयुगल असल्याची चर्चा परिसरात होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,नागपुरच्या पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात हा प्रकार  घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव बगमारे आणि जान्हवी नायले असे आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणींचे नाव आहे.  दोघे सध्या वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होते.काल मध्यरात्रीचा सुमारास गौरव बगमारेच्या घराशेजारील  वापरात नसलेल्या घरात दोघे गेले आणि तिथेच गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून आकस्मिक मृत्यूचे प्रकरण नोंदविले आहे. दोघांवर काही दबाव होता का आणि त्याचा आत्महत्येशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहे.


आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही युवक व युवती एकाच वेळी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करत आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. हे युवक व युवती प्रेमीयुगल असल्याची चर्चा  परिसरात सुरु आहे.