नागपूर : विदर्भात (Vidarbha) 5 आणि 6 सप्टेंबर रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस हे पावसाचे असणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. यंदाच्या वर्षात विदर्भात सरासरीपेक्षा 14 टक्के पावसाची तूट आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भासाठी मंगळवार (5 सप्टेंबर) रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भात पुढील तीन ते चार दिवस चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, विदर्भात यंदाच्या मोसमात आतापर्यंत 14 टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेंत पडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट ओढावलं आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर हा ऑगस्ट महिन्यात मात्र चांगलाच ओसरला. त्यामुळे अनेक पिकं ही अगदी संपून जाण्याच्या अवस्थेमध्ये आहेत.
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रामध्येही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5,6 आणि 7 तारखेला काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातली 4, 5 आणि 6 तारखेला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.
घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण
दरम्यान पुणे आणि इतर घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. पंरतु तरीही शेतीच्या दृष्टीने अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. कोकण, गोवा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील सात दिवस पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 7 सप्टेंबरनंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासूनच राज्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. अजूनही पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी चिंतेत
अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यात मागील एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोयाबीन आणि तुरीचे पिक अक्षरशः वाळलंय. त्यामुळे पाऊस जर झाला नाही तर या पिकांमधून काहीही उत्पन्न मिळणार नसल्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतेय. म्हणूनच आता संपूर्ण राज्यभरातून वरुणराजाला साकडं घातलं जातयं.