नागपूर: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या महिला, अल्पवयीन मुली यांच्यावरील अत्याचारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे, तर राज्यभरातून अत्याचाराच्या (Nagpur Crime) अशा अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. या दरम्यान, नागपूरच्या पारडी परिसरातून एक प्रसंगावधान दाखवणारी घटना समोर आली आहे. शालेय विद्यार्थिनीसोबत ऑटो चालकाच्या वादानंतर विद्यार्थिनींनी प्रसंगावधान दाखवत ऑटो (Auto Driver) थांबवायला लावलं आणि लोकांच्या मदतीने ऑटो चालकाला चांगलाच धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे.


नागपूरच्या पारडी परिसरात मंगळवारी दुपारी चार शालेय विद्यार्थिनी ऑटोमधून प्रवास करत असताना, त्यांचा ऑटोचालकाशी वाद झाला. चारही विद्यार्थिनी ऑटोमध्ये जोरात बोलत असल्यामुळे ऑटो चालकाने त्यांना हळू बोलण्यास सांगितले. या मुद्द्यावरून विद्यार्थिनींचा ऑटोचालकासोबत जोरदार शाब्दिक वाद झाला. ऑटो चालकाने  (Auto Driver) वादात धमकी दिल्यासारखे शब्द वापरल्यामुळे विद्यार्थिनींनी त्याला लगेच ऑटो थांबवायला सांगितलं. 


ऑटो थांबताच एका विद्यार्थीनीने ऑटो चालकाला मारायला सुरुवात केली.. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी विद्यार्थिनींना येऊन कारण विचारले. दोन्ही विद्यार्थिनींनी ऑटो चालकाने केलेल्या दुर्व्यवहार आणि दिलेल्या धमकीची माहिती देताच लोकांनीही ऑटो चालकाला  (Auto Driver) पकडून चांगला चोप दिला. दरम्यान हा ऑटो चालक मद्यपान करून ऑटो चालवत होता अशी माहिती समोर आली आहे.


या घटनेनंतर पोलिसांनी शालेय विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधले. मात्र त्यांनी कुठलीही तक्रार देण्यास नकार दिली. त्यामुळे पोलिसांनी ऑटो चालकाला  (Auto Driver) समज देऊन सोडण्यात आलं आहे. मंगळवारच्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या मोठ्या घटना 


राज्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापूरमध्यो दोन चिमरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर त्यानंतर पुणे, अकोल, मुंबईतील खारघर, पुणे जिल्ह्यातील दौंड जिल्ह्यात अशा एक ना अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 


'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज


शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.