Nagpur CNG Price : नागपुरात आज सीएनजीचे दर खाली आले आहेत. सोमवारी रात्री अचानकच नागपुरात शंभर रुपये किलो दरानं विकला जाणारा सीएनजी 120 रुपयांपर्यंत वाढला होता. काल एबीपी माझानं या संदर्भात बातमी दाखवली आणि आज पुन्हा नागपुरात सीएनजीचे दर दहा रुपयांनी खाली आले आहे. आज नागपुरात सीएनजी 110 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. 


नागपुरात सीएनजीचे वितरण करणाऱ्या रॉमेट कंपनीच्या पंपावरील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, सीएनजीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असून कमी दरात सीएनजी उपलब्ध होत असल्यामुळं दर कमी करण्यात आले आहेत. दरम्यान वाहनचालकांचा दरातील अशा चढ उतारावर विश्वास नाही. एका दिवसात वाढ आणि पुन्हा दर खाली आणणं, ही प्रक्रिया विश्वासार्ह वाटत नाही, असं वाहनचालकांचं म्हणणं आहे. यासंदर्भात सरकारनं काहीतरी नियम करावे, असं मत अनेक वाहनचालकांनी व्यक्त केलं आहे. 


शंभर रुपये प्रति किलोवरुन थेट 120 रुपये प्रतिकिलो दरावर सीएनजी पोहोचल्यामुळं सीएनजी आधारित वाहन चालवणाऱ्यांच्या खिशाला मोठा चाप बसला होता. नागरिकांमधून यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. कोरोना, लॉकडाऊन यांमुळे आधीपासूनच महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट यामुळं आणखी बिघडल्याचंही काही नागरिकांचं म्हणणं होतं. अशातच आता पुन्हा सीएनजीच्या दरांत कपात करण्यात आल्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


नागपुरात सीएनजीचा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रॉमेट या कंपनीचे आहेत. तिनही ठिकाणी सीएनजीचे दर 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. रॉमेट कंपनीच्या अधिकार्‍यांशी एबीपी माझानं बातचित केली होती. त्यांचं म्हणणं आहे की, नागपुरात सीएनजी वाहण्यासाठीचा खर्च कमालीचा वाढला आहे. 


गुजरातमधील दहेजमधून एलएनजी (LNG) आणून नागपुरात त्याचं सीएनजीमध्ये रूपांतरण केलं जातं. जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच एलएनजीचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय गुजरातमधून नागपूरपर्यंत एलएनजी आणण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागपुरात सीएनजीचे दर शंभर रुपये प्रतिकिलो वरून 120 रुपये प्रतिकिलो करावे लागले आहेत. नागपूरपर्यंत गॅस वाहून आणणारी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर सीएनजीचे दर खाली येतील, असं रॉमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


दरम्यान, पाच राज्यातल्या निवडणुकांचा रणसंग्राम संपला आहे. साऱ्यांचं लक्ष आता निवडणुकांच्या निकालाकडे आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर नागरिकांनाही धडकी भरली. कोणत्याही क्षणी इंधन दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, केंद्र सरकार ही दरवाढी जाहीर करणार असल्याची चर्चा आहेत. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळं कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. त्यामुळे आता पेट्रोल कंपन्यांची भूमिका आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :