नागपूर: वापरात नसलेली रस्त्याच्या कडेला उभी असलेली एखादी कार चिमुकल्यांसाठी किती धोकादायक ठरू शकते याचं एक दुर्दैवी उदाहरण नागपुरात समोर आलंय. कारमध्ये बसण्याच्या मोहापायी तीन चिमुकले कारमध्ये बसले खरे, मात्र नंतर त्यामधून कधीच बाहेर येऊ शकले नाही. कारमध्ये गेल्यानंतर कार आतून लॉक झाली आणि त्या तिन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी त्यांच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.
नागपूरमध्ये रस्त्यावर उभी असलेल्या इकोस्पोर्ट कारमध्ये या तीन मुलांचा मृत्यू झाला. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत फारूकनगर परिसरातून शनिवारी दुपारपासून सहा वर्षांची आलिया खान, सहा वर्षांची आफरीन खान आणि चार वर्षांचा तौफिक खान हे तिघे चिमुकले बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तिघांचा युद्ध पातळीवर शोध सुरू केला होता.
या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले, मात्र तिन्ही मुलं फारुख नगर किंवा आजूबाजूच्या वस्तीतील कुठल्याच ठिकाणी दिसून आले नाही. तीनही चिमुकल्यांचं कोणी अपहरण केलं आहे अशी कोणतीही शक्यता दिसून न आल्यामुळे पोलिसांनी काल सकाळपासून पुन्हा एकदा संपूर्ण परिसरात कॉम्बिग ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याच दरम्यान रविवारी संध्याकाळी उशिरा तिन्ही चिमुकल्यांच्या घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका वर्कशॉप समोर उभ्या असलेल्या फोर्ड इकोस्पोर्ट कार मध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले.
संबंधित कार अनेक दिवसांपासून तिथे उभी असल्याने त्याच्या काचेवर आतून बाहेरून धूळ जमलेली होती. कारच्या आतून दार उघडता येईल असे हँडल किंवा लिव्हर लागलेले नव्हते. कारची काच खाली करता येईल अशी यंत्रणाही त्यात नव्हती. ती कार जवळच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आली होती. त्यात अडकल्याने श्वास गुदमरून तिन्ही मुलांचा मृत्यू झाला असावा असंच आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय.
तिन्ही मुलं शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. त्यामुळे त्यांचा फारुख नगरसह अवतीभवतीच्या वस्त्यांमध्ये शोध घेतला जात होता. मात्र घरापासून शंभर मीटर अंतरावर उभ्या असलेल्या कारमध्ये कोणत्याही पोलिसांनी डोकावून पाहिले नाही आणि त्यामुळेच मुलांचे मृतदेह सापडायलाही दीड दिवसांचा कालावधी गेला. कदाचित शनिवारी मुलं बेपत्ता झाल्यानंतर काही मिनिटातच कोणी उभ्या असलेल्या कारमध्ये डोकावून पाहिले असते तर तिन्ही चिमुकल्यांचा जीव वाचला असता.
ही संबंधित बातमी वाचा: