Nagpur Latest Crime : नागपूरमध्ये तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले आहेत. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळलेत. मोठ्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत आहेत, त्यामध्येच कारमध्ये आता तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यामुळे नागपूर हादरले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतून मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य प्रदेशमधील एका आरोपीला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच आता तीन मुलांचे मृतदेह आढळल्यामुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. शनिवारी नागपुरात तीन लहान भाऊ-बहीण बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. खेळण्यासाठी बाहेर पडलेले मुले संध्याकाळ झाली तरी परतले नव्हते. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. आज या तिहांचे मृतदेह आढळले. 


पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाली होती. तौसिफ खान (वय 4 वर्ष) , आलिया खान (वय 6) आणि आफरीन खान (वय 6 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. ही तिन्ही मुले एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार घटनास्थळाजवळ कार दुरुस्ती करणारे गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली इकोस्पोर्ट कार एका बंद घरासमोर उभी होती. त्या कारला गडद काळ्या रंगाच्या फिल्मस लागलेल्या होत्या आणि त्याच कारमध्ये ही मुलं जाऊन बसली असावी. आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.   


काल दुपारी 12 वाजता टेका नाका परिसरातील फारूक नगरच्या मैदानावर मुलं खेळण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. रात्र झाली तरी मुलं न परतल्यामुळे कुटुंबांनी पोलिस स्टेशन गाठले होते. पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नागपूरच्या फारूकनगर मध्ये एका कार मध्ये तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले.   नागपूर पोलिसांना मोठ्या घातपाताची शंका आहे. पोलीस याचा तपास करत आहे. कालच नागपूर पोलिसांनी रेल्वे स्थानकावर एका लहान मुलाला पळून नेणाऱ्या चोरट्याला अटक केली होती. तो मध्य प्रदेशचा होता. ते प्रकरण ताजे असतानाच आज तीन चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे पोलीस घटनेचा सखोल  तपास करत आहेत.