Bombay High Court Nagpur Bench : विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा विषय लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं (Bombay High Court Nagpur Bench) सुट्टीच्या दिवशी कामकाज केलं आहे. नागपूर खंडपीठाने प्रकरणाची गरज लक्षात घेता 15 ऑगस्टला सुट्टीच्या दिवशी कामकाज करुन एका आदिवासी विद्यार्थ्याला दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळं संबंधित विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. गौरव वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो काटोल येथील रहिवासी आहे. 


पडताळणी समितीनं 10 नोव्हेंबर 2022 रोजी गौरवचा माना अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केला होता. त्यामुळं त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता त्याला 16 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यामुळं उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि महेंद्र चांदवाणी यांनी या प्रकरणावर 15 ऑगस्ट रोजी सुनावणी घेतली. दरम्यान, रेकॉर्डवरील पुरावे पाहता पडताळणी समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द केला आहे. तसेच, गौरवला माना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा आदेश देखील न्यायालयानं दिला आहे. 


गौरवच्या वंशावळीतील सात सदस्यांना माना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात त्याच्या वडिलांचाही समावेश आहे. असे असताना त्याला वैधता प्रमाणपत्र नाकारले गेले होते. गौरवतर्फे ॲड. प्रिती राणे यांनी बाजू मांडली.


महत्त्वाच्या बातम्या:


CJI Uday Lalit : तुम्ही काय केलं ते महत्त्वाचं नाही, ते कशा पद्धतीने केलं हे महत्त्वाचं: सरन्यायाधीश उदय लळीत