नागपूर :  अवैधरित्या एका गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असतांना फुग्याच्या सिलेंडरच्या (Cylinder) स्फोटात एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी 24 डिसेंबरला सदरच्या व्हीसीए स्टेडियमजवळील चर्चसमोर घडली. या प्रकरणाचा तपासतून पोलिसांना  (Nagpur Police) आरोपी फुगेवाल्याची ओळख पटली आहे. सत्येंद्र सिंग असे या आरोपीचे नाव असून तो नागपूरच्या पाचपावली परिसरातील रहिवासी आहे. मात्र या आरोपीने घटना घडल्यानंतर कुटुंबासह पळ काढला असल्याची माहती समोर आली आहे.  याप्रकरणी फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.


नंबरप्लेट, युपीआयमुळे पटली ओळख; मात्र आरोपी फरार 


या प्रकरणातील आरोपी सत्येंद्र हा अवैधरित्या एका गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाल्याची बाब तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असताना त्यांना एका वाहनाची नंबरप्लेट आढळून आली. या  नंबरप्लेटच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपीची ओळख पटली. दरम्यान मृतकाच्या नातेवाइकाने त्याला युपीआयवरून पेमेंट केल्याने त्याचा मोबाइल क्रमांक देखील हाती लागला आहे. मात्र त्यावर फोन केला असता तो नंबर सध्या स्विच ऑफ असून पोलिसांनी त्याच्या घरी चौकशी केली असता, तो आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी पोलीस आरोपी  सत्येंद्रचा शोध घेत आहे. 


चार वर्षीय  सिझानचा दुर्दैवी मृत्यू


यात्रा आणि यात्रेत येणारे रंगीबेरंगी फुगे हे लहान मुलांना आकर्षित करतात. पण हेच फुगे आणि या फुग्यात असलेला हेलियम गॅस जीवघेणाही ठरु शकतो. नागपुरातल्या सिव्हील लाईन परिसरात रविवारी अशीच एक दुर्दैवी घटना झाली. एका फुगे विक्रेत्याजवळचा सिलेंडर फुटला. स्फोट एवढा भीषण होता की सिलेंडर हवेत अनेक फूट उंचीपर्यंत फेकला गेला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या चार वर्षीय  सिझान आसिफ शेखच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत शिजानसोबत त्याच्या कुटुंबातील इतर दोन महिलाही जखमी झाल्या. तिघांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी शिजानचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे मृत शिजान हा फुगेवाल्याच्या जवळ नव्हता. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा होता. तरीही या स्फोटात उडालेला सिलेंडर डोक्यावर कोसळून शिजानचा मृत्यू झाला.


तज्ञांनी काय सांगितलं ?


तज्ञांच्या मते प्रत्येकच शहरात गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रीचा व्यवसाय करणारे कोणत्याही परवान्याशिवाय आणि प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय करत असतात. त्यांच्याकडील सिलेंडरमध्ये नायट्रोजन किंवा हेलियम गॅस असते. या सिलेंडरचे मेंटेनन्स केले जात नाही. त्यामुळे त्याचा स्फोट होणे किंवा गर्दीच्या ठिकाणी गॅस गळती होते. फक्त फुगे खरेदी करण्यासाठी आलेल्या लहान मुलांसाठीच नाही तर शिजानसारख्या निर्दोषांसाठीही धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने फुगेवाल्या संदर्भात काही नियम तयार करणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही फुगेवाल्यांच्या जवळ उभे असताना सावध राहण्याची गरज आहे.