नागपूर : कॉँग्रेसचे माजी आमदार  सुनील केदार (Sunil Kedar) यांना शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाने बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली. सुनील केदारांनी त्यानंतर लगेच जामिनासाठी अर्ज सादर केला होता. मात्र त्यादिवशी विलंब झाल्यामुळे त्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर लागोपाठ तीन दिवस सुट्या आल्या, त्यामुळे आज मंगळवार 26 डिसेंबरला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एस. भोसले (पाटील) यांच्या न्यायालयापुढे केदार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज दुपार पर्यंत या अर्जावर निकाल येणे अपेक्षित आहे. आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सुनील केदारांची अँजिओग्राफी


सावनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेले सुनील केदार यांना शिक्षा सुनावली गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल केल्या गेले. दरम्यान, नागपुरातील मेडिकलच्या अतिदक्षता विभाग मध्ये उपचार सुरू असतांना त्यांनी मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर रविवारी एमआरआयचा अहवाल सामान्य असल्याची माहिती मिळाली. छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले. परंतु इको सामान्य असल्याने अँजिओग्राफी सांगण्यात आली. मात्र क्रिएटीनीन वाढल्याने त्यांची 'सीटी, अँजिओग्राफी' तपासणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आज मंगळवारी क्रिएटीनीन तपासणीनंतर ती नॉर्मल आल्यास 'सीटी  अँजिओग्राफी', ईसीजी तपासणी केली जाईल. सध्या केदार यांना खोकल्यासह श्वसनाची समस्या कायम असून, मायग्रेनमुळे डोकेदुखीचाही त्रास कमी जास्त प्रमाणात होत असल्यामुळे ऑक्सिजन देण्यात येत आहे. तर रविवारी त्यांना 102 डिग्री ताप असल्याची देखील माहिती समोर आली आहे.


2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा


नागपूर जिल्हा बँक  घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज  लागला. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.  


हे ही वाचा :