Nagpur Ash Dam Accident : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा (Ash Dam) फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालं आहे. बंधाऱ्यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पसरला आहे. त्यामुळे नुकतंच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. 


महानिर्मितीकडून दुरुस्तीच्या कामाला विलंब


खापरखेडा औष्णिक वीज केंद्रामधून निघणारी राख जवळच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात साठवली जाते. सुमारे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला राखेचा हा बंधारा काठोकाठ भरलेला आहे. काल सकाळी या बंधाराच्या एका भागातून राख मिश्रित चिखलयुक्त पाणी बाहेर निघू लागलं. गावकऱ्यांनी बंधार्‍याला गळती लागल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र, महानिर्मितीकडून दुरुस्तीचे काम सुरु होता होता दुपार झाली आणि संध्याकाळ होता होता छोट्या गळतीचे रुपांतर बंधारा फुटण्यामध्ये झाले. परिणामी मोठ्या प्रमाणावर चिखलयुक्त राख बंधाऱ्याला लागून असलेल्या शेतीमध्ये पसरली.. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राखेचा चिखल सर्वत्र पसरला आहे.


उन्हाळ्यात राखेचा बंधारा रिकामा का केला नाही? गावकऱ्यांचा सवाल


नागपुरात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही, काल मध्यम स्वरुपाच्या पावसामध्येच जर राखेचा बंधारा फुटणार असेल तर मुसळधार पावसाच्या वेळेला काय होईल अशी भीती स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काठोकाठ भरलेला राखेचा बंधारा उन्हाळ्याच्या काळात मोकळीक असताना का रिकामा करण्यात आला नाही असा प्रश्नही गावकऱ्यांनी विचारला आहे. 


लवकरच गळती थांबवू : महानिर्मिती


महानिर्मितीने बंधारात भेग पडलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु केले असून लवकरच बंधाऱ्यातून होणारी गळती थांबवली जाईल अशी माहिती दिली आहे. मात्र महानिर्मितीचा कोणताही अधिकारी याविषयी कॅमेरासमोर बोलायला तयार नाही.


राखमिश्रीत पाण्याचा शेतीवर परिणाम 


खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणाव राख बाहेर निघते. दररोज या राखेची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. पण तसं केलं जात नाही. ही राख खसाळा-म्हसाळा परिसरातील तयार करण्यात आलेल्या तलावात साठवून ठेवली जाते. हाच बंधारा काल फुटला आणि त्यातून राखमिश्रीत पाणी शेतात गेलं. हे राखमिश्रीत पाणी शेतांमध्ये शिरलं आणि राखेचा थर तयार झाला की, त्या जमिनीवर पुढील काही वर्षे पीक घेता येत नाही. त्यातच कालच्या घटनेमुळे शेतावर राखेचा थरा जमा झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.


हेही वाचा 


Naxal Movement In India: इतिहासात पहिल्यांदाच नक्षलवादी सुरक्षा यंत्रेणेपुढे हतबल, सुरक्षा यंत्रेणेच्या यशाचं कौतुक