Maharashtra Nagpur Accident : नागपूरमध्ये रविवारी (9 जुलै) संध्याकाळी भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. रामटेक भंडारा रोडवरील (Ramtek-Bhandara Road) खंडाळा गावाजवळ भरधाव कारने धोकादायक पद्धतीने थांबलेल्या कंटेनर ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दहा महिन्यांचं बाळ, आठ वर्षीय मुलगा आणि 70 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
Maharashtra Nagpur Accident: अपघातात वृद्धासह, दहा महिन्यांचं बाळ आणि आठ वर्षीय मुलाचा मृत्यू
नागपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-भंडारा रस्त्यावर रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. कारमधील सर्व जण भंडारा जिल्ह्यातील साकोली इथले असून देवदर्शनासाठी ते रामटेकला आले होते. भंडाऱ्याकडे परत जात असताना खंडाळा गावाजवळ रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. ज्यात एका वृद्धासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. परशराम भेंडारकर, हिमांशू भेंडारकर आणि भार्गवी बोंद्रे अशी मृतांची नावं आहेत.
Maharashtra Nagpur Accident : धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या ट्रकला कारची धडक
ट्रक चालकाने कोणतंही इंडिकेटर न वापरता बेदरकारपणे वाहन रस्त्यावर उभं केल्याने इतर वाहनधारकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात मागून वेगात येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की अपघातात कारमधील तीन जणांनी प्राण सोडले. तर सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातात कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती आरोली पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Maharashtra Nagpur Accident : ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या कारमध्ये पाच लहान मुलांसह नऊ जण प्रवास करत होते. अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी वृद्धासह तिघांना मृत घोषित केलं. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अपघातग्रस्त कारमधील सर्व जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra Nagpur Accident : नागपुरात दुचाकीची रस्त्याच्या दुभाजकाला धडक, एकाचा मृत्यू
दरम्यान नागपुरातील झिरो माईलजवळ झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी (7 जुलै) मृत्यू झाला. न्यू नरसाळा इथल्या सुदर्शन नगरमध्ये राहणारे सुरेश नेताम हे 6 जुलै रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. दुचाकीवरुन जात असताना सुरेश नेताम यांचा झिरो माईलजवळ रस्त्याच्या दुभाजकाला धडक होऊन अपघात झाला होता. शुक्रवारी (7 जुलै) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
Nagpur Accident : नागपुरात कारनं माय-लेकाला चिरडलं; फरार कंत्राटदाराला वरोरा येथून अटक