Nagpur Accident News : नागपुरात माय-लेकाला कारखाली चिरडून फरार झालेल्या कारचालकाला बेलतरोडी पोलिसांनी (Nagpur Police) वरोरा येथून अटक केली आहे. प्रसाद यशवंत देशमाने (वय 27, रा. चैतन्यनगर, वरोरा, जि. चंद्रपूर) असे अटकेतील कारचालकाचे नाव आहे. तो बांधकाम कंत्राटदार आहे. देवकाबाई महादेवराव पुंजरवार (वय 72) आणि त्यांचा मुलगा गणेश (वय 53, दोन्ही रा. सुयोगनगर, अजनी) अशी मृतकांची नावे आहेत.


सुधाबाई सुधाकर गोरशेट्टीवार (वय 71, रा. ओमनगर) या जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. देवकाबाई यांच्या मुलीची सासू सुधा यांचा 12 फेब्रुवारीला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त खापरीतील तृप्ती हॉटेलमध्ये सर्व नातेवाइक जेवायला गेले. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास सर्वजण रस्ता पार करून कारजवळ जात होते. याचवेळी वर्धेकडून येणाऱ्या भरधाव कारने सुधा, गणेश आणि देवकाबाई या तिघांना धडक दिली.


कारसह चालक झाला होता फरार


अपघातानंतर चालक कारसह पसार झाला. नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून देवकाबाई आणि गणेश यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त वियजकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, हेडकॉन्स्टेबल शैलेश बडोदेकर, सुहास शिंगणे, कुणाल लांडगे यांनी सीसीटीव्हीद्वारे चालकाचा शोध सुरू केला.


झाकून ठेवली होती कार...


पोलिसांनी दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एमएच-34-एएम-2610 या क्रमांकाच्या कारने हा प्राणांतिक अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. ही कार कालिंदी यशवंत देशमाने यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. पोलिसांनी शोध घेतला असता कार रेवतीनगरमध्ये एका अपार्टमेंटजवळ झाकूण ठेवण्यात आल्याचे आढळले. चौकशीदरम्यान प्रसादनेच अपघात केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला अटक केली.


अशी घडली होती घटना


आईच्या वाढदिवसाच्या साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांसाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत  महिलेच्या पती आणि सासूचा मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. गणेश माधवराव पुंजरवार (वय 53) आणि देवकाबाई माधवराव पुंजरवार (वय 70, सुयोगनगर) अशी मृतांची नावे आहेत. गणेश पुंजरवार यांच्या पत्नीच्या आईचा वाढदिवस होता. त्यामुळे त्या पती, सासू, भाऊ, वहिनी आणि इतर कुटुंबीयांसह वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये रात्री जेवणासाठी गेल्या. संबंधित हॉटेल बंद झाल्याने त्यांनी कार तेथेच पार्क केली आणि पलीकडे असलेल्या हॉटेल तृप्ती येथे जेवण केले. जेवण करून घरी जाण्यासाठी सर्व निघाले, कारपर्यंत जाण्यासाठी सर्वजण वर्धा मार्ग ओलांडत होते. वाढदिवस असलेल्या सुधाबाई सुधाकर गोरशेट्टीवार (वय 71, ओमनगर) यांच्यासह गणेश व देवकाबाई होत्या. वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यात तिघेही जण गंभीर जखमी झाले. कारचालक लगेच फरार झाला. जोरदार आवाज झाल्याने सर्वांनी मागे वळून पाहिले असता भयानक दृश्य दिसले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nagpur News : चिमुकल्याची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील डॉक्टरविरुद्ध अखेर गुन्हा दाखल