Nagpur News : नागपुरातील भाजपच्या (BJP) कार्यकर्त्या सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता (Missing) आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) इथे व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या सना खान 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये (Mankapur Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल झाले आहे, मात्र, संबंधित व्यक्ती तिथून फरार असल्याची माहिती समोर आली आहे.


बिझनेस ट्रिपला गेलेल्या सना खान अद्याप परतलेल्या नाहीत


सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. बिझनेस पार्टनरने त्यांचा खून केल्याचा तर्क लढवला जात आहे. मात्र पोलिसांना अद्याप सना खान यांचा मृतदेह मिळालेला नाही, त्यामुळे या तर्काला कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जबलपूरमध्ये सना खान यांचा साहू नावाचा बिझनेस पार्टनर आहे, जो या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. सना खान  1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या आणि दुसऱ्या दिवसापासून त्या बेपत्ता आहेत. साहूचा जबलपूरमध्ये ढाबा आहे. 


1 ऑगस्टपासून सना यांच्याशी संपर्क न झाल्याने संशय वाढाला आणि त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी मानकापूर पोलिसांत दाखल केली.


सना खान यांचा मृत्यू अथवा खून झाल्याचे पुरावे नाहीत : पोलीस


"आम्ही कुटुंबियांच्या तक्रारीवरुन सना खान बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. आमचं पथक जबलपूरला रवाना झालं आहे, परंतु सध्या तरी सना खान यांचा शोध लागलेला नाही. तसंच त्यांचा मृत्यू अथवा खून झाल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे त्या जिवंत आहेत किंवा नाहीत याबाबत भाष्य करु शकत नाही. आमचा तपास सुरु आहे," अशी माहिती मानकापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली.


दरम्यान सना खान यांचा बिझनेस पार्टनर साहू हा त्याच्या ढाब्यातील कर्मचाऱ्यांसह पसार झाला आहे. पोलीस त्याच्या मूळगावात देखील पोहोचले पण तिथेही तो सापडला नाही. साहूची पत्नी ही जबलपूर पोलिसांत आहे. परंतु आम्ही एकत्र नसून घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असल्याचं तिने म्हटलं.


तर साहूने सना खान यांची हत्या करुन त्यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो धरण किंवा नर्मदा नदीमध्ये फेकला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.याशिवाय  पोलिसांनी बार्घी धरणातही शोध घेतला, परंतु तिथे काहीही सापडलं नाही.