नागपूर   : नागपूर (Nagpur) आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्कराचा प्रयत्न राज्य सीमा शुल्क विभागानं हाणून पाडला आहे. पकडण्यात आलेला नागरिक हा मूळचा केरळ येथील राहिवासी असून  या नागरिकाला अटक (Crime) करण्यात आली आहे. तस्कराने छुप्या मार्गाने अंतर्वस्त्रात 549 ग्रॅम वजनाचे  सोनं आपल्या सोबत आणले होते. कस्टम पथकानं गोपनीय माहितीच्या (Nagpur News) आधारे ही कारवाई केली असून तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 34 लाख रुपये इतकी असून तस्करानं शारजा इथून सोनं तस्करी करून आणले असल्याचे कबूल केले आहे. 


अंतर्वस्त्रात लपवला 549 ग्रॅम सोन्याचा गोळा


नागपूर विमानतळ सोन्याच्या तस्करीसाठी आता हब होऊ लागले आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून  नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करीच्या घटना सातत्याने उघड होत आहे. अशीच एक कारवाई  1 जानेवारी 2024 ला कस्टम आणि डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विमानतळावर करण्यात आली होती ज्यामध्ये  एका प्रवाशाकडून तब्बल दोन किलो सोने जप्त करण्यात आले होते. शाहजहा ते नागपूर येणाऱ्या एअर अरेबियाच्याच्या विमानात रामटेके नावाचा प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करीत होता. त्याने कंबरेच्या पट्ट्यात सोन्याची छडी चपटी करुन आणली होती. दोन्ही विभागांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.


ही घटना ताजी असतांनाच आता परत एकदा सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्कराचा प्रयत्न राज्य सीमा शुल्क विभागानं हाणून पाडला आहे. एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिटला गोपनीय माहिती मिळाली होती. ज्यामध्ये कतार एअरवेजच्या फ्लाइट क्र.क्यूआर 590 या विमानानं प्रवास करत असलेला प्रवासी हा सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या माहितीच्या आधारे संशयित तस्कराला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्यामुळं त्या तस्कराची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीत त्याच्या अंतर्वस्त्रात 549 ग्रॅम सोन्याचा गोळा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे.


पहिल्यांदाच नागपुरात प्रवास


केरळमधील रहिवासी असलेल्या या प्रवाशाने 25 जानेवारीच्या पहाटे नागपूर विमानतळावर पाऊल ठेवले. तस्करानं पहिल्यांदाच नागपुरात प्रवास करून सीमा शुल्क चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागपूर विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या सतर्क आणि दक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेत त्याच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. त्यानंत या तस्कराला आडवून अंगझडती घेण्यात आली आणि पुढील प्रक्रियेनंतर सोने जप्त केले. अधीक्षक प्रकाश कापसे आणि सुधाकर बारापात्रे, निरीक्षक कृष्णकांत धाकर, सुभम पंथी कोरी आणि हवालदार अनुराग परीकर हे पथकात होते. सीमाशुल्क कायदा,1962 अन्वये नागपूर कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या