MVA Rally In Nagpur : भाजप अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगरमधील मैदानावर ही सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आरएसएसवर चौफेर हल्ला चढवलेले उद्धव ठाकरे नागपुरातील सभेत काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष असले, तरी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अजितदादा पवार यांच्या भाषणाकडे सर्वाधिक लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून दादा भाजपकडे झुकल्याचे चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम देणार की? पुन्हा चर्चेचा वाट मोकळी करून देणार? याकडे लक्ष आहे. तसेच अदानी आणि मोदींच्या डिग्रीच्या मुद्यावरूनही महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत. सावरकर मुद्यावरून गोंधळ दिसून आला होता. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे वज्रमूठमधून मिळणार का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
अजित पवार यांनीच खुलासा करायला हवा
संजय राऊत यांनी आपल्या सामनामधील 'रोखठोक'मध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा श्री. अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात श्री. पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.
भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही
संजय राऊत रोखठोक सदरात म्हणतात, एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेईमानांचे सरदार झाले. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले.
इतर महत्वाच्या बातम्या