नागपूर : घरघुती वादातून पत्नी आणि मुलाची हत्या करुन त्यांचे मृतदेह खड्ड्यात पुरल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी शिवारात घडली आहे. या घटनेने नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लता बावणे (40 वर्ष) व धीरज बावणे (18 वर्ष) अशी घटनेतील मृतकांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी अनिरुद्ध बावणेला (43 वर्ष) अटक केले आहे.


नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत घोटमुंढरी शिवारात ही घटना घडली. खात गावात राहणाऱ्या आरोपी अनिरुद्ध बावणे (43 वर्ष) यांचे त्याच्या पहिल्या पत्नीसोबत गेल्या काही वर्षापासून वाद होते. त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. काही दिवसांपूर्वी अनिरुद्धची पत्नी लता बावणे आणि मुलगा धीरज बावणे हे दोघे खात गावाला आले होते.

अनिरुद्धने त्या दोघांना घोटमुंढरी शिवारातील शेताकडे नेले आणि तिथे दोघांचाही खून करुन त्यांचे मृतदेह शेतामध्ये खड्डा करुन पुरले. लता आणि धीरज 27 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यामुळे लताच्या माहेरच्या लोकांनी भंडारा पोलिसांमध्ये तक्रारही नोंदवली होती.

पोलीस तपासात अनिरुद्धने पत्नी आणि मुलाला बस स्थानकावर सोडल्याचे सांगितले होते. मात्र, बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता याबाबतची पुष्टी होऊ शकली नाही. त्यामुळे अरोली पोलिसांनी अनिरुद्धला ताब्यात घेऊन विचारणा केली. पोलिसी खाक्या दाखवताच अनिरुद्धने दोघांचाही खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतक लता आणि धीरजचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता पाठवले आहेत.