नागपूर : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून सुरुवात झाली आहे. कळंबच्या श्री चिंतामणी गणपतीची आरती करुन जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली. हे विघ्नांचे सरकार आहे, देवाने हे विघ्न दूर करावे. सामान्य जनतेला दिलासा मिळाला पाहिजे, असं साकडे आम्ही देवाला घातल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले आहेत.चौथ्या टप्प्यात जनसंघर्ष यात्रा यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.
अशोक चव्हाण यांनी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर ओवीसी आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचंही चव्हाण म्हणाले. "राज्यात चांदा ते बांदा भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवणार आहे. मात्र, विद्यमान युती सरकारची दुष्काळाचा सामना करण्यासाठी तयारी नाही. हे विघ्नांचे सरकार आहे, देवाने हे विघ्न दूर करावे. सामान्य जनतेला दिलासा मिळाला पाहिजे", असं साकडं आम्ही देवाला घातल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
यवतमाळमधील पोस्टल ग्राऊंडवर झालेल्या सभेत काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणपीस यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली. गणपतीच काय आता जनता ही आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला आता काळजी नाही. आता जनताच आमची निवडणूक लढवेल आणि आम्हाला जिंकवेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पहिला टप्पा
जनसंघर्ष यात्रेचा पहिला टप्पा 31 ऑगस्टला कोल्हापुरातून सुरु झाला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून ही जनसंघर्ष यात्रा निघाली होती.पश्चिम महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याची समारोप सभा पुण्यात झाली.
दुसरा टप्पा
जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 4 ऑक्टोबरला जळगावच्या फैजपूरमधून सुरु झाला होता. दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसच्या नेत्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमधील जनसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधला.
तिसरा टप्पा
जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत पार पडला. या काळात लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांच्या सभा झाल्या होत्या.