भंडारा : भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा गावच्या गावकऱ्यांनी अनैतिक संबंध असलेल्या प्रेमीयुगुलाची धिंड काढली. दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेचे गावातीलच पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. दोघांच्या संबंधांमुळे घरात तणाव होता. त्यामुळे पुरुषाच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोघांची धिंड काढली.


कोंढा इथल्या पुरुषाचे घराजवळच राहणाऱ्या आणि दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची चर्चा गावात अनेक दिवसांपासून होती. याबाबत तिला आणि पुरुषाला गावातील अनेकांनी समजावलंही होते. मात्र काल अचानक संबंधित महिला पुरुषाच्या घरी आली आणि आम्हाला पती-पत्नीप्रमाणे राहायचं आहे, असं बोलू लागली. यावरुन घरात वाद सुरु झाला. त्यातच मोठा भाऊ, धाकटा भाऊ, त्यांची पत्नी, वडिलांनी त्या दोघांना रिक्षात बसवून गावात धिंड काढली.

या प्रकरणी संबंधित पुरुषाने अढ्याळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर दहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.