MPSC Exam : आज एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षा आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यानंतर संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर हे आंदोलन करत बसले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांचा दावा केला आहे की, सकाळी त्यांना परीक्षा केंद्र मधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपने संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून देत परीक्षा केंद्र समोर ठिय्या आंदोलनाला बसले आहे. 


पोलिसांचा दावा आहे की, प्रश्नसंचाचे तिन्ही सील पेपर सुरू होईपर्यंत शाबूत होत्या. पोलिसांनी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर अभाविपच्या एका कार्यकर्तीला परीक्षा केंद्रात नेऊन सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अभाविपच्या कार्यकर्तीचा आरोप आहे की, परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने तिच्यासमोर प्रश्न संचाचे तीन सील पैकी एक सील आधीच फोडण्यात आल्याचे मान्य केले. या घटनेनंतर अभाविपचे कार्यकर्ते आंदोलनावर बसले असून संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.


दरम्यान, आजच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2021 चा पेपर फटल्याबाबत अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, याबाबत आता आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहे. 


दुसरीकडे, मुंबई परीक्षेचे केंद्र असलेल्या परीक्षार्थींना नियोजित रिपोर्टिंग टाईम पेक्षा पाच - दहा मिनिटे उशीर झाला तरीसुद्धा परीक्षेस बसण्यास दिले जात नाहीय. अनेक उमेदवार वर्षभरापासून या परीक्षेचा अभ्यास करत असतात. मात्र पेपर सुरू न होता सुद्धा, विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टाईमनुसार उशीर झाल्याने परीक्षा देऊ दिली जात नाहीय. विद्यार्थ्यांनी - पालकांनी परीक्षा नियंत्रकांना विनवणी करून सुद्धा या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टाईम नुसार उशीर झाल्याने या पेपरला मुकावे लागलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha