Mahavikas Aghadi Andolan : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलने केली जात आहेत. तर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात आज महाविकास आघाडीकडून नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. मात्र, हे महाविकास आघाडीचे आंदोलन असले तरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन असल्याचे दिसून आले.


सुमारे अर्धा तास उशिरा सुरू झालेल्या आंदोलनात बराच वेळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. थोड्या वेळाने काँग्रेसचे मोजके पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. तर शिवसेना संपूर्णपणे या आंदोलनापासून लांब राहिल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचा एकही कार्यकर्ता किंवा नेता या आंदोलनात फिरकला नाही. त्यामुळे ईडी व इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाई विरोधात संघर्षाची भाषा करणारे महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष आंदोलनात एकत्रित नाहीत असेच चित्र आज नागपुरात दिसून आले. 




 
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी कारवायांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी केंद्र सरकार आणि त्यांच्या तपास यंत्रणांना जशाच तसा उत्तर देण्याचे ठरवले आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते थोड्यावेळात आंदोलनात सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. तसेच काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारे यांनी शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते थोड्याच वेळात या आंदोलनात सहभागी होतील असा दावा केला. मात्र, आंदोलन संपेपर्यंत शिवसेनेचा कोणताही नेता किंवा कार्यकर्ता आंदोलनस्थळी पोहोचला नसल्याचे दिसून आले. 


तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. ईडीनं 23 फेब्रुवारी रोजी सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: