Nagpur News : नागपूरच्या (Nagpur) सतरंजीपुरा परिसरात आज (23 मार्च) पहाटे एनआयएच्या (NIA) टीमने कारवाई केली. एनआयएच्या पथकाने जमात ए रजा मुस्तफा या संघटनेचा म्होरक्या असलेला गुलाम मुस्तफा याचा शोध घेतल्याची माहिती आहे. गुलाम मुस्तफा हा देशविघातक शक्तीसोबत संपर्कात होता, त्यांच्याशी चॅटिंग करत होता, अशी एनआयएला शंका आहे. त्यासंदर्भात एनआयएचं पथक नागपुरात दाखल झालं होतं.  


एनआयएच्या 20 अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक पहाटे नागपुरात


आज पहाटे चारच्या सुमारास एनआयचे दिल्लीतून आलेले 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नागपुरातील सतरंजीपुरा परिसरातील बडी मशीद परिसरात दाखल झाले. त्यांनी गुलाम मुस्तफा नावाच्या व्यक्तीचा शोध सुरु केला. एनआयएला माहिती मिळाली होती की, तो याच बडी मशीद परिसरात भाड्याने राहत आहे. 


इतर दोघांचीही एनआयएकडून चौकशी


गुलाम मुस्तफा हा जमात ए रजा मुस्तफा या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी देश विघातक कारवाई करत असल्याची माहिती एनआयएकडे होती. त्यासंदर्भात एनआयएचं पथक आज नागपुरात दाखल झालं. तसंच याच बडी मशीद परिसरात अहमद रझा वल्द मोह आणि अख्तर रझा वल्द मोह नावाच्या दोघांचीही चौकशी एनआयएने केली. 






या छाप्यादरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी देखील हजर होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती.


स्थानिक रहिवासी काय म्हणाले?


दरम्यान, स्थानिक रहिवासी यासंदर्भात वेगळीच माहिती देत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, परिसरातील एका तरुणाने 2017 च्या सुमारास पाकिस्तानमधील काही मौलानांसोबत व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला होता. त्याचे काही पुरावे आणि व्हिडीओ एनआयएकडे होते. मात्र त्या तरुणाने कुठेही देश विघातक काम केलेलं नाही. एनआयएला काहीतरी संभ्रम झाला आहे, असा स्थानिक नागरिकांचा दावा आहे.


दरम्यान, एनआयएची कारवाई सुमारे चार तास चालली. सकाळी आठ वाजेपर्यंत एनआयएचं पथक शोध घेत होतं. सध्या दोघांना नोटीस देऊन पथक परतलं आहे. एनआयएने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. शोध मोहिमेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.


VIDEO : Nagpur NIA : नागपुरात NIA ची धाड, देशविरोधी कारवाई करणाऱ्यांसोबत चॅटिंग केल्याप्रकरणी कारवाई