Sharad Pawar : नागपुरातील (Nagpur) फुटाळा तलावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून लाईट अँड लेझर शो तयार करण्यात आला आहे. हा शो पाहण्यासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आले होते. यावेळी नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. अवघ्या आठ तासात शरद पवार आणि नितीन गडकरी दुसऱ्यांदा एकत्रित आल्यानं विविध चर्चांना उधाण आले होते.


साखर कारखानदारीसह शेती विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा


लाईट अँड लेझर शोमध्ये मुळात नागपूर शहराचा प्राचीन काळापासून आजवरचा इतिहास सांगितला जातो. शरद पवार यांनी काल रात्री तो शो पाहिला. दरम्यान, काल दुपारी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट झाली होती. नागपुरात नितीन गडकरी यांच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. गेल्या दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ऊसशेती, साखर कारखानदारी आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पुन्हा रात्री लाईट अँड लेझर शो पाहण्यासाठी शरद पवार आणि गडकरी एकत्र आले होते.


नागपूरमधील गोपालपूर आणि म्हसाळा इथं वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शाखा होणार


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसीय नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या दीड महिन्यात शरद पवार यांचा हा दुसरा दौरा आहे. या दोन्ही दौऱ्यात पवारांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. शरद पवारांचा दौरा प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सिवनी या ठिकाणी होणाऱ्या आदिवासी अधिकार मेळाव्यातील उपस्थितीसाठी आहे. मात्र त्यापूर्वी काल दहा वाजता शरद पवार नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते थेट वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी घेतलेल्या जमिनीची (फार्म) पाहणी करण्यासाठी गेले. विदर्भातही साखर उद्योगाचा विकास व्हावा ऊस लागवडीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विदर्भात एक शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या शाखेसाठी निश्चित झालेल्या जागेची पाहणी केली.


महत्त्वाच्या बातम्या:


Sharad Pawar Nagpur Visit : शरद पवार यांचा दोन दिवसीय नागपूर दौरा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी घेतलेल्या जमिनीची पाहणी करणार