Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नागपूर दौऱ्यावरुन (Nagpur Visit) देशमुख काका-पुतण्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. शरद पवार आपल्या फार्मवर ऊसाची पाहणी करायला येणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला होता. परंतु राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी हा दावा फेटाळत शरद पवारांच्या दौऱ्यात आशिष देशमुख यांच्या फार्मच्या भेटीला कार्यक्रम नाही, असं सांगितलं आहे. 


पवारांच्या दौऱ्यात आशिष देशमुख यांच्या फार्म भेटीचा कार्यक्रम नाही : अनिल देशमुख


नागपूर दौऱ्यात शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष या नात्याने गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या शाखेसाठी निश्चित झालेल्या जागेची पाहणी करायला जाणार आहेत. या जागेच्या शेजारीच आपलं फार्म असल्याने शरद पवार भेट देतील असं आशिष देशमुख यांनी सांगितलं होतं. याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारलं असता ते म्हणाले की, "शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्यात आशिष देशमुख यांच्या फार्मच्या भेटीचा कार्यक्रम नाही. त्यामुळे ते आशिष देशमुख यांच्या फार्मला शरद पवार हे भेट देतील की नाही हे निश्चित नाही. 


अनिल देशमुखांकडे विकासाचं मॉडेल नाही : आशिष देशमुख 


तर याबाबत एबीपी माझाशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, माझ्या शेताच्या बाजूला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जागा आहे. ती जागा बघायला शरद पवार येत आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या माझ्या शेतात एकरी 72 टन ऊस उत्पादनाचं एक मॉडेल तयार केल आहे, ते बघायला शरद पवार येणार आहे. माझ्याकडे विकासाचं मॉडेल आहे. अनिल देशमुख यांनी असं एखादं मॉडेल विकसित केलं नाही. त्यामुळे शरद पवार अनिल देशमुख यांच्या शेतावर न जात माझ्या शेताची पाहणी करत आहेत, असं म्हणत आशिष देशमुख यांनी टोला लगावला.


खरंतर अनिल देशमुख आणि आशिष देशमुख हे नात्याने काका-पुतणे आहेत. परंतु राजकारणातील इतर काका-पुण्यासारखं त्यांच्या नात्यातही कटुता आहे. अनिल देशमुख आणि आशिष देशमुख हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशमुख काका-पुतण्यामध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे.


शरद पवार यांचा नागपूर दौरा


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात आहेत. शरद पवारांचा दौरा प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सिवनी या ठिकाणी उद्याला होणाऱ्या आदिवासी अधिकार मेळाव्यातील उपस्थितीसाठी आहे. मात्र त्यापूर्वी आज सकाळी साडे दहा वाजता शरद पवार नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते थेट वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी घेतलेल्या जमिनीची (फार्म) पाहणी करण्यासाठी गेले.  विदर्भातही साखर उद्योगाचा विकास व्हावा ऊस लागवडीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विदर्भात एक शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या शाखेसाठी निश्चित झालेल्या जागेची पाहणी केली. दरम्यान, शरद पवार आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. आज त्यांचा नागपूरला मुक्काम असून उद्या ते मध्य प्रदेशातील सिवनीतील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.


VIDEO : शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशमुख काका-पुतण्यामध्ये चढाओढ