नागपूर : दुष्काळाचं संकट ओढवलेल्या महाराष्ट्रामध्ये पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केलीये. पण नागपुरात (Nagpur) झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या आहे. तर नागपूर शहरात  अंबाझरी, सीताबर्डी, कॉर्पोरेट लेआऊट आणि वेलकम सोसायटी भागात पाणी साचलं असून यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मीराबाई पिल्ले आणि संध्या ढोरे असं मृत महिलांचं नाव आहे.  नागपुरातील नाग नदी (Naag River) परिसरात तुफान पाऊस बरसला. त्यामुळे नाग नदीला पूर आला आहे. दरम्यान नागपुरात आलेल्या या महापुराचं कारण सध्या समोर येत आहे. 


नागपुरातील महापुराची कारणं काय?


दरम्यान नागपुरातील महापुराचं कारण सध्या समोर आलं आहे. नाग नदी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. याच नदीचा उगम नागपूरजवळील लाव्हा परिरातून होतो. तर लाव्हा परिरस आणि त्या भोवतीचा जो वाडी परिसर आहे, त्या भागामध्ये तब्बल 229 मिमी पावसाची नोंद करण्यात झालीये. त्यामुळे पाण्याचा प्रचंड लोट घेऊन नाग नाला हा अंबादरी परिसरामध्ये शिरला. 


अंबादरी तलाव आधीच काठोकाठ भरला होता. त्यातच शुक्रवार रात्रीच्या पावसामुळे अंबादरी तलाव देखील ओव्हरफ्लो झाला. तसेच वाडी परिसरातून मोठ्या प्रमाणावर पाणी नागपूरमध्ये येणे या कारणांमुळे नागपुरात महापुराचं संकट ओढावलं असल्याचं सांगितलं जात आहे. नागपूर शहरामध्ये अवघा 100 मिमी पाऊस झाला. पण शेजारी असलेल्या वाडी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात पुराचं संकट ओढावलं.  


नागपुरात कुठे किती पाऊस? 


नागपूर विमानतळ परिसरामध्ये 111 मिमी पावसाची नोंद झाली, तर सीतीबर्डी परिसरामध्ये देखील 111 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पार्डी भागामध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच वाडी परिसरामध्ये सर्वाधिक 229 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रात्रीपासून नागपुरात सुरु असलेल्या पावसाने शनिवार सकाळपासून थोडी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतय. पावसाने जरी उसंत घेतली असली तरीही नागपूरच्या सीताबर्डी , धंतोली मार्केट मधील  काही दुकानांमधील पाणी अजूनही ओसरलं नाही. अजूनही अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्याची दुकानं, हॉटेलमध्ये पाणी भरलं आहे. नागपूर महानगर पालिकेचे पथक युद्ध पातळीवर पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही अनेक दुकानातील पाणी ओसरलं नाही. 


दरम्यान नागपूरमध्ये शनिवार (23 सप्टेंबर) रोजी देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलीये. नागपूरची पूरस्थिती लक्षात घेता शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


हेही वाचा : 


नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला पूर, घरांमध्येही पाणी शिरलं, वाहानांचं मोठं नुकसान