Nagpur Crime : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कामठी (Kamathi) भागात एका माजी नगरसेवकावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दंडुक्याने हा हल्ला केल्याचे समजते. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव दिलीप बांडेबुचे (Dilip Bandebuche) असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आठ ते दहा अज्ञात लोकांचा जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिलीप बांडेबुचे बुधवारी रात्री त्यांची जिम बंद करून अकरा वाजताच्या सुमारास नेहरूनगर भागातून जात असताना, त्यांच्यावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. अज्ञात लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत दिलीप बांडेबुचे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या वेळेस झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर निघाल्यामुळे दिलीप बांडेबुचे यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे.
नागपूरवर 'क्राईम कॅपिटल' चा ठपका
नागपूरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नागपूरला क्राईम कॅपिटल असे देखील म्हटले जाते. शहरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या आणि खुनाच्या प्रकारानंतर आता हल्ल्यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाण्यांची भूमिका महत्त्वाची असते. पोलिस ठाण्यांकडून होणाऱ्या गस्ती आणि विविध पेट्रोलिंगसोबतच, विविध वस्त्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांची माहिती आणि इतर अनेक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत असते. मात्र या सर्वांना केराची टोपली दाखवत इथल्या गुन्हेगारांची हिम्मत वाढली असून पोलिसांची दरारा नाहीस होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>>